जो ‘फिट’ तोच विश्वचषकासाठी ‘हिट’ – रवी शास्त्री

सामना प्रतिनिधी, मुंबई

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघव्यवस्थापकाच्या माध्यमातून आतापासून २०१९च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी संघउभारणी करायला सुरुवात केली आहे. मंगळवारीच निवड समिती अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कामगिरीतील सातत्य राखण्याचा अल्टिमेटम दिला होता. हिंदुस्थानचे मुख्य क्रिकेट प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघातील खेळाडूंना फिटनेस राखलात तरच विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवाल असा गर्भित इशारा देऊन सावध केले आहे. ‘महागुरू’ शास्त्री यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वरील मत व्यक्त केलेय.

२०१९ ला इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडिया सर्वोत्तम ‘फिट’ आणि तंदुरुस्त संघ असायला हवा. कारण विश्वचषकात उत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघच मोठी बाजी मारू शकतो हे आपण लक्षात ठेवायला हवे असे सांगून रवी शास्त्री म्हणाले, मैदानात जे क्रिकेटपटू सर्वाधिक ‘फिट’ असतील त्यांनाच विश्वचषक लढतीच्या अंतिम संघात स्थान मिळेल. तेव्हा आतापासूनच सर्व खेळाडूंनी आपला ‘फिटनेस’ वाढवण्यासाठी आणि राखण्यासाठी विशेष परिश्रम घ्यायला हवेत. जो ‘फिट’ तोच विश्वचषकासाठी ‘हिट’ ठरेल हा कानमंत्रही शास्त्रीनी दिला.

मैदानाबाहेर ताठ मानेने फिरता यायला हवे
क्रिकेट मैदानातील आपली कामगिरी अशी अभिमानास्पद व्हायला हवी की मैदानाबाहेरही आपल्याला ताठ मानेने फिरता यायला हवे असे सांगून शास्त्री म्हणाले, स्कोअरकार्डाव्यतिरिक्तही क्रिकेटमध्ये आणखी काही वैशिष्टय़े असतात याचे भान आपण ठेवायला हवे. कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षकांनी दोन झेल सोडले. दुसऱ्या कसोटीत हार्दिक पांड्य़ाने दोन नोबॉल तर मोहम्मद शमीने एक नोबॉल टाकला. अशा गोष्टी आपल्याला भविष्यात टाळायला हव्यात.

संघ नेहमी कर्णधाराचा; मी बॅकस्टेज कलाकारच
क्रिकेट मैदानाच्या रंगमंचावर कर्णधार हाच संघाचा ‘महानायक’ असतो. मी प्रशिक्षक म्हणून बॅकस्टेज कलाकाराच्या भूमिकेत असतो याचा पुनरुच्चारही महागुरू शास्त्री यांनी केला. माझे काम हे संघाला मार्गदर्शन करणे आहे. त्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन कर्णधारच संघाला यशाच्या मार्गावर नेत असतो, असेही शास्त्री यांनी स्पष्ट केले.