फिटनेसचा नवा फंडा….

<< निमिष वा. पाटगांवकर  >>

साधारणपणे दोन दशकांपूर्वीपर्यंत आपल्या फिटनेसच्या कल्पना साध्यासुध्या होत्या. एकतर घरीच काय जमेल तो व्यायाम, सूर्यनमस्कार घालायचे किंवा घराजवळच्या कुठल्यातरी व्यायामशाळेत जायचे. या व्यायामशाळांचे स्वरूपही ठरलेले असायचे. व्यायाम प्रकार करायला थोडी मोकळी जागा, एका मोठ्या आरशासमोर मांडून ठेवलेली वर्षानुवर्षे वापरून जुनी झालेली डंबेल्स, बेंच प्रेस किंवा इतर साधनांना लागणाऱ्या बाकड्यांच्या आसनातून डोकावणारा स्पंज, अनेक वर्षे राबता असलेल्यांची दादागिरी आणि न चुकता दर शनिवारी हनुमानाची आरती आणि वाढवलेल्या श्रीफळाचा प्रसाद.

कालांतराने या फिटनेसच्या कल्पना बदलत गेल्या. व्यायामशाळा हळूहळू लुप्त होत गेल्या आणि गल्लोगल्ली अत्याधुनिक जिम्नॅशियम्सचे पेव फुटले. सूर्यनमस्कारातील नावांच्या, जोरबैठकांच्या हुंकारांच्या आणि `सत्राणे उड्डाणे’ आरतीच्या जयघोषाच्या जागी बॉलीवूड रॅप किंवा तत्सम गाणी व्यायामाला पूरक म्हणून घुमू लागली आणि हळूहळू फिटनेस किंवा जिमची मेंबरशिप हा एक स्टेटसचा भाग होऊन बसला. जुन्या व्यायामशाळांच्या घरगुती वातावरणातून अत्याधुनिक जिममध्ये रूपांतर हे फारच धंदेवाईक वाटत असले तरी या स्टेटसच्या निमित्ताने का होईना, लोकांचे पाय फिटनेसकडे वळले हा बदल या डायबेटीस आणि हृदयविकार यांचे माहेर असलेल्या देशात सुखावहच मानला पाहिजे.

जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी वाढत जाते तेव्हा पर्यायही वाढत जातात हा कुठल्याही बाजाराचा  नियम या फिटनेसच्या बाजारालाही लागू पडतो. आज फिटनेसचे जिम्नॅशियमव्यतिरिक्त अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. एकेकाळी सायकल चालवणे हा एकतर गरजेचा किंवा छंदाचा भाग होता. सायकलसुद्धा ठरलेल्या कंपन्यांच्या किंवा ठरावीक मॉडेलच्या असायच्या. घरातल्या मोठय़ांच्या सायकलवर पाय खाली पोहोचत नसले तरी कसरत करत आपल्यापैकी कित्येकांनी सायकल चालवणे शिकले असेल. कुणा भाग्यवंताकडे गिअरची सायकल असली तर त्याचा कोण हेवा वाटायचा! हेच सायकलिंग आज एक फिटनेसचा प्रकार म्हणून आज लोकप्रियता पावत आहे. सायकल वाहनावरून आपला वाहनप्रवास ज्यांनी चालू केला होता तेच आता आपल्या आलिशान गाड्या पार्क करून पुन्हा सायकलकडे वळले आहेत. यात अगदी फिल्म स्टारसुद्धा मागे नाहीत. परदेशात उपलब्ध असलेले माऊंटन बायकिंगचे पर्याय आपल्याकडेही आता हळूहळू उपलब्ध होऊ लागले आहेत आणि त्यासाठी लागणारी सायकल आणि साधनसामग्रीही परवडेल अशा भावात उपलब्ध झाली आहे. जगात प्रचलित असलेल्या माऊंटन बायकिंगच्या व्याख्यानुसार नाही, पण निव्वळ हौस आणि धाडस म्हणून आपल्या सायकलीने किल्लेकपाऱया पार करणारे हौशी माऊंटन बायकिंग करणारे आपल्याकडे कित्येक वर्षांपासून आहेत. जे नियमित सायकलिंग करतात त्यांना २००  किंवा ४००  च्या `बीआरएम’ चे वेध लागलेले असतात. `बीआरएम’चा उगम Brevets de Randonneurss Mondiaux  फ्रेंच वाक्यातून झाला आणि थोडक्यात अर्थ म्हणजे जागतिक हायकर्स जे जगभर कुठेही सायकलस्वारीला जात असतात. यात टूर द फ्रान्ससारखी स्पर्धा नसते, तर असते एक खेळीमेळीचे वातावरण जे एकमेकांना हात देत सर्व ग्रुपला आगेकूच करायला मदत करत असतात.

मॅरेथॉनमुळे जशी धावण्याची गोडी लागली तशीच या सायकलिंगच्या विविध प्रकारांनी आणि उपलब्ध विविध प्रकारच्या सायकलनी लोकांचे सायकलिंगप्रेम वाढत चालले आहे. धावणे, पोहणे आणि सायकलिंग एकत्र असलेला ट्रायथलॉन प्रकारही हिंदुस्थानात आता लोकप्रिय होऊ लागला आहे. ऑलिम्पिक पातळीवर ट्रायथलॉन करायची असली तर  दीड किलोमीटर पोहणे, पाठोपाठ ४० किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर १० किलोमीटर धावणे करायचे असल्याने तुमच्या फिटनेसचा खरा कस लागतो. हिंदुस्थानात आज पंचवीस मॅरेथॉन होत असतील तर दहाबारा ट्रायथलॉनही आयोजित होतात यावरून लोकांचा या प्रकाराकडे वाढलेला उत्साह दिसून येतो.

हिंदुस्थानींचा साहसी खेळाकडे बघायचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत चालला आहे. कामशेतपासून लडाखपर्यंत पॅराग्लायडिंगने हवेत भराऱ्या मारायला क्लब आहेत तर कोकण, गोव्यापासून थेट अंदमानपर्यंत समुद्राच्या पोटात शिरायला स्कुबा डायव्हिंगचा पर्याय आहे. उत्तराखंडात रिव्हर राफ्टिंग आहे तर कर्नाटक, केरळात कयाकिंग आहे.

फिटनेस म्हणून साहसी खेळाकडे पाहताना काही गोष्टी मात्र नक्की ध्यानात ठेवायला हव्यात. पहिले म्हणजे आपल्या साहसाची मजल आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास हवा. कुणीएक करतो म्हणून अनुकरण करण्याने साहसी खेळ अंगाशी येऊ शकतात. दुसरे म्हणजे जर एखादी दुर्घटना घडली तर आपला विमा साहसी खेळात घडलेल्या अपघातांना संरक्षण देतो का याची पूर्ण माहिती करूनच साहसी खेळात उतरावे. परदेशात बऱ्याचदा अशा खेळांना विमा संरक्षण नसते किंवा जास्त हप्ता भरून ते घ्यावे लागते. हिंदुस्थानात त्याचप्रमाणे एखाद्या साहसी खेळाच्या ठिकाणी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात का याचीही माहिती करून घेतलेली बरी.

साहसी खेळातला थरार आकर्षित करत असला तरी बाकीच्या खेळांच्या मानाने त्यात असलेला जास्त धोका आणि त्या बदल्यात मिळणारे फायदे याचे त्रैराशिक कधी कधी मांडावेसे वाटते. फॉर्म्युला वनचा राजा मायकेल शुमाकरचा स्कीईंग करताना झालेला अपघात बघितला की इतकेच वाटते, खेळासाठी जीवन आहे, पण हौस म्हणून काय किंवा फिटनेस म्हणून साहसी खेळांचा पर्याय स्वीकारताना जीवनाचा खेळ व्हायला नको.