फिट है हिट है!!

3

राजेश शृंगारपुरे, [email protected]

मस्त पिळदार शरीरयष्टी, ऍब्स… सगळय़ांनाच हवेहवेसे.. पण त्यासाठी लागणारी मेहनत… ही एक साधनाच… अभिनेते आणि फिटनेस मॉडेल राजेश शृंगारपुरे दर आठवडय़ाला घेऊन येणार एक फिटनेस सेलेब्रिटी आपल्या भेटीला…

नमस्कार वाचक हो!

आजवर सिनेमा-मालिका यांच्या माध्यमातून मी नेहमीच आपल्यासमोर आलो आहे. मी साकारलेल्या भूमिकांवर आणि पर्यायाने माझ्यावर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. एक नट म्हणून आजवर तुमच्यासमोर अभिनय कौशल्य सादर केले. मात्र आता आपल्यासाठी आपल्यातील तरुणाईसाठी नव्याने एक साप्ताहिक सदर घेऊन येत आहे. विषय… अर्थातच ‘व्यायाम’.

फिट है, तो हिट है… अगदी समर्पक असे विधान करून एकंदरच व्यायामाचे आपल्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व तुमच्यासमोर मांडत आहे.
व्यायाम म्हणजे काय? तर व्यायाम म्हणजे व्यक्तिमत्त्वात रंग भरणे. राजबिंडा, रुबाबदार ही बिरुदे स्वतःच्या नावासोबत तेव्हाच जोडली जातात जेव्हा तुम्ही नित्य नियमाने व्यायाम करून स्वतःला सुदृढ बनवता. आकर्षक व्यक्तिमत्त्वाने चारचौघात लक्ष वेधून घेता. ‘बट… नो गेन विदाऊट पेन’ शब्दात मांडण्याइतके सहज सोपे नव्हे हे. यासाठी दृढ निश्चय, वज्र निर्धार, नियोजन, जिद्द, चिकाटी आणि संतुलित आहार व पुरेसा आराम घेत स्वतःशी प्रामाणिक राहणे.

आज आपल्यासमोर व्यायामाचे महत्त्व सादर करताना एक वेगळेच समाधान लाभत आहे. चला, एक नजर टाकू…

मी आणि माझी व्यायाम साधना

माझ्या आजच्या पिळदार शरीरयष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली ती मी इयत्ता पाचवीत असताना. याचे पूर्ण श्रेय मी माझ्या वडिलांना देतो. त्यांनादेखील व्यायामाची आवड होती. त्याकाळी व्यायामशाळा असायच्या. त्या व्यायामशाळेत मल्लंखांब, रोमन रिंग, मृगदळ यावर कसरती करीत व्यायाम या प्रकाराला सुरुवात झाली आणि त्यातून व्यायामाची गोडी निर्माण झाली ती कायमची. पुढे ऐन उमेदित नियमित व्यायाम ही जणू सवयच झाली. वाचून गंमत वाटेल, पण चक्क पावसाळ्यात ही पहाटे धावणे कधी टाळले नाही. परिसरातील लोकांसाठी तो कधी एक मजेचा विषय बनला, तर कधी कुतूहलाचा.
माझा फिटनेस मंत्र म्हणजे… माणसाच्या हाती काही असो वा नसो. स्वतःची तब्येत चांगली ठेवणे हे नक्कीच त्याच्या हाती आहे. माझ्या अनुभवानुसार 20 टक्के शरीर हे व्यायामाने घडते तर इतर शारीरिक घडण ही तुमचा आहार, आराम एकंदरच नित्य जीवनशैली यावर आधारित असते. लवकर निजावे, लवकर उठावे, त्यासी आरोग्य उत्तम लाभावे असे योगशास्त्रात लिहिलेच आहे की. मुंबईत असलो की मी दररोज जीममध्ये जातो. शूटिंगच्या वेळेनुसार कधी तासभर तर कधी दोन-अडीच तास व्यायाम करतो. विविध बॉडी पार्टनुसार प्रत्येक दिवशी व्यायाम विभागून घेतो. प्रत्येक बॉडी मसल डेव्हलप होण्यासाठी शरीराच्या ठरावीक भागास एक दिवस व्यायाम आणि एक दिवस आराम हे समीकरण जुळवणे गरजेचे असते. यालाच अल्टर्नेट सेटअप असेही संबोधले जाते. योग्य प्रशिक्षक हाताशी घेऊन तुम्ही आपापल्या दैनंदिन व्यायामाचे नियोजन करू शकता. अर्धवट आणि चुकीच्या माहिती आधारे व्यायाम करणे टाळावे.

आहाराविषयक थोडक्यात

शरीरासाठी दिवसातून चारवेळा खाणे आवश्यक असले तरी प्रत्येकाची दिनचर्या, अंग मेहनत, शारीरिक हालचाल यावरून त्यांची पचनशक्ती कार्यरत होते. दिवसभर धावपळ असल्यास अन्न रीतसर पचते. मात्र शारीरिक हालचाल कमी असल्यास अन्न साचते आणि त्याचे रुपांतर मेद म्हणजेच चरबीत होते. शरीर स्थूल होते म्हणून शारीरिक हालचालीनुसार अन्न ग्रहण करावे. रोजच्या आहारात पालेभाज्या असाव्यात. चिकन, अंडी, दूध यांचा समतोल असावा. मुख्य म्हणजे रोज एखादे तरी फळ खावे. आमच्या वडिलांचा हा कानमंत्र. निसर्गाने विविध ऋतूत ठराविक फळे निर्माण केली आहेत. त्यानुसार त्यांचे गुणविशेष आहेत. म्हणून ऋतूप्रमाणे जी फळे पिकतात ती ग्रहण करावीत. म्हणजेच त्यातील पोषक जीवनसत्त्वे शरीराला मिळतात आणि याहुनी महत्त्वाचे म्हणजे शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखणे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे तर पाणी हे अमृत आहे. गरजेनुसार आहार आणि वेळेनुसार पाणी ही बाब लक्षात असू दे. पुन्हा भेटू… पुढच्या भागात… एका नव्या नामांकित व्यक्तिमत्त्वासोबत.

काय टाळावे…
आयुष्य जगणे तसे खडतर आहे. सुख-दुःख यांचा लपंडाव आहे. इथे 100 टक्के सुखी-समृद्ध असा कुणीच नाही. सगळे आलबेल असेल तर उत्तमच, मात्र जीवनातील उतार-चढाव कुणालाही चुकलेला नाही. इथे राजाचा रंकही होतो आणि रंकाचा राजाही. त्यामुळे जीवनात जेव्हा असा उतार येतो पर्यायी कामकाजावर परिणाम होतो. आर्थिक समीकरणे गडबडतात, मानसिक संतुलन बिघडते. त्याचा थेट परिणाम तुम्ही आजवर कमावलेल्या, घडवलेल्या शरीरावर होतो. अशावेळी काय करावे? मुळात हे प्रश्नचिन्ह काढून फेकून द्यावे आणि विचार करावा की काय करावे! हा उद्गारवाचक भाव मनी उमटला की बघा! किती तरी राहून गेलेल्या गोष्टी आवडी, छंद समोर येतात. त्यात स्वतःला गुंतवावे. आपल्या परिवारातील सदस्यांसोबत वेळ घालवणे, पुस्तके वाचणे या सर्वांतून आपसूकच एक वेगळाच आनंद निर्माण होतो. त्याचा उत्तम परिणाम मनावर होतो. शरीर तणावमुक्त होते. तणाव ‘हा शरीराची झीज करतो’ म्हणून नेहमी प्रसन्न, प्रफुल्लित राहणे. आमच्या फिल्मक्षेत्रात एरवी सगळेच छोटय़ा-मोठय़ा कामात व्यस्त असतात. मात्र कधीतरी असा एखादा काळ येऊन जातो जेव्हा काहीच काम नसते किंवा ते अचानक थांबते. हीच ती वेळ, डोक्याला हात लावून चिंताग्रस्त होण्यापेक्षा आपल्या कुटुंबात मिसळा, एरव्ही शूटिंगच्या दगदगीत सगळ्यांपासून दुरावलेले असता, त्या सगळे राहून गेलेल्या गोष्टी करून बघा. वेळेचे काय… ती तर बदलत राहते. आज आपली… उद्या दुसऱयाची… परवा पुन्हा आपली.