धक्कादायक! कुलाब्याच्या प्रतिष्ठित शाळेतील पाच विद्यार्थिनी पळून गेल्या

सामना प्रतिनिधी । मुंबई

कुलाब्यातील कॉन्व्हेंट स्कूलच्या पाच विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडल्या आणि घडय़ाळातील ‘टेन्शन’चा काटा पुढे पुढे सरकू लागला. दुपारी अडीचनंतर सुरुवातीचे काही तास हे घराबाहेर पडणे तसे हौसेमौजेचे मानले जात होते, पण काटा सरकू लागला तसे टेन्शनही वाढले. एकीकडे मुंबईतील स्त्रिया-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच या पाचही मुलींच्या बेपत्ता होण्याच्या बातमीने अवघ्या मुंबईत घर केले. सोशल मीडियावरून तर ही बातमी गरागरा फिरू लागलीच, पण पोलिसांचे पथकही कामाला लागले. शहरात लागलेल्या सीसीटीव्हींचा आधार घेतला जाऊ लागला. त्याआधारे लोकेशन समजू लागले आणि अखेर 26 तासांनंतर या पाचपैकी चौघीजणी कुर्ला स्थानकात सापडल्या. एकजण संध्याकाळी घरी परतली. रहस्यभेद झाला होता. आठवीत नापास झाल्यामुळे त्यांनी घर सोडल्याचे पोलिसांनी सांगितले.

 शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शाळेतून सुटल्यानंतर त्या मुली नरीमन पॉइंट येथे चालत गेल्या. कुलाब्यातील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूलचा शुक्रवारी ओपन डे होता. हा दिवस रिझल्टचा. चाचणी परीक्षेत या पाचही विद्यार्थिनींना कमी गुण मिळाल्याने त्या प्रचंड घाबरल्या होत्या. दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या घरी गेल्याच नाहीत, पळून गेल्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी न परतल्यामुळे खळबळ उडाली होती. एका वेळेस पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे कळताच पोलिसांनी लगेच शोधाशोध सुरू केली. या मुलींकडे मोबाईल नसल्याने त्यांचे लोकेशनही सापडत नव्हते. सोशल मीडियावरदेखील मुलींचे फोटो व्हायरल करण्यात आले. शहरात विनयभंग, छेडछाड, अपहरणाचे गुन्हे सातत्याने घडत असताना मुली अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांसह पोलीसही प्रचंड टेन्शनमध्ये आले होते.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास टेन्शन संपवणारा फोन अखेर खणाणला. कुर्ला स्थानकातून पुष्पा देशमुख या महिलेने एका मुलीच्या नातेवाईकाला फोन केला आणि चार मुली आमच्या ताब्यात असल्याची बातमी दिली. हे ऐकून सर्वांचाच जीव भांडय़ात पडला. आता मुली कधी येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर रहस्यमय 26 तासांनंतर चार मुलींना घेऊन पोलीस कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि सर्वांचाच जीव भांडय़ात पडला. मात्र पाचवी मुलगी काही सापडली नव्हती. त्यामुळे पोलिसांची शोधाशोध सुरूच होती. त्या पाचव्या मुलीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके पोलिसांनी कामाला लावली होती. अखेर रात्री उशिरा जिची वाट सर्वजण बघत होते ती पाचवी मुलगीही घरी परतली.

ते तिघे देवदूतासारखे आले
– पनवेलला राहणाऱया पुष्पलता देशमुख या खरेदी करण्यासाठी दादरला निघाल्या होत्या. दादरची लोकल पकडण्यासाठी त्या कुर्ला स्थानकात उतरल्या तेव्हा त्या मुली त्यांच्या नजरेस पडल्या. पुष्पलता यापूर्वी कफ परेडच्या गणेशमूर्ती नगरात राहायच्या. त्यामुळे त्यांनी तेथे राहणाऱ्या मुलीला ओळखले. चौघीजणी प्रचंड घाबरलेल्या होत्या. पुष्पलता यांच्यासह चिराग दोशी आणि रमेश घुले यांनी मुलींना ताब्यात घेतले. त्यांना आधार देत शांत केले. त्यानंतर पुष्पलता यांनी मुलीच्या नातेवाईकांना सांगून मुलींना आम्ही घेऊन येत असल्याचे कळवले. त्यानुसार त्या चौघींना घेऊन ते सीएसएमटीला गेले. मग तेथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

भाजप नेत्यांची चमकोगिरी
– मुली कुलाबा पोलीस ठाण्यात आल्यानंतर भाजप नेते राज पुरोहित आणि शायना एन. सी. यांची मीडियाला बाइट देण्यासाठी चढाओढ लागली होती. दोघेही पालकांच्या भेटी घेत असताना त्यांचे सहकारी मोबाईलमध्ये तो प्रसंग कॅमेराबद्ध करीत होते.
– त्यानंतर त्या दादरला गेल्या. तेथून ठाणे गाठले. मग रात्री पुन्हा त्या दादरला परतल्या. दादरहून माहीमला गेल्या. रात्रभर मग त्या माहीम चर्चमध्ये बसून राहिल्या.
– आज सकाळी त्या कुर्ला रेल्वे स्थानकात आल्या. एक्स्प्रेस गाडी पकडून त्या कुठे जाणार तेवढय़ात पुष्पलता यांच्या नजरेस त्या पडल्या.

प्रत्येक मार्गावरील सीसीटीव्ही तपासले
मुली अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी कंट्रोलला मेसेज करून शोधमोहीम सुरू केली. शाळेपासून सर्व सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. त्या ज्या मार्गाने जात होत्या तेथील सर्व सीसीटीव्ही पाहण्यात आले. कुलाब्यातील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूल ते दादर असा मुलींनी केलेला प्रवास पोलिसांच्या सीसीटीव्हीत कैद झाला होता.

रक्षाबंधनाचे पैसे होते
त्या पाचही मुलींजवळ मोबाईल नव्हता. त्यामुळे त्यांना शोधणे अधिकच कठीण बनले होते. पण त्यांच्याकडे रक्षाबंधनाला मिळालेले पैसे होते. तेवढेच पैसे मुलींकडे आहेत. त्यामुळे ते पैसे त्यांना कितपत पुरतील अशी चिंता पालकांना होती.