ट्रक आणि स्कॉर्पिओच्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू


सामना ऑनलाईन । मेहकर

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर-डोणगाव रस्त्यावर अंजनी गावाजवळ सोमवारी पहाटे ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी सर्वजण हे मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक गावातील जुमडे कुटुंबातील आहेत. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातील महू येथे अभिवादन करून परतत असताना अगदी घराजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी जुमडे कुटुंबीय शनिवारी स्वत:च्या स्कॉर्पिओ गाडीने मध्य प्रदेशातील महू येथे गेले होते. अभिवादन करून ते परत येत होते. अंजनी गावाच्या केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर असताना समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात मनोहर जुमडे (55), जयवंता जुमडे (62), स्नेहल जुमडे (20), कोमल जुमडे (22) राजरत्न जुमडे (8 महीने) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ताई जुमडे (50), कमला जुमडे (53), विशाल खरात (25), नेहा इंगळे (22) व प्रतिक जुमडे (15) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी कमल जुमडे यांना संभाजीनगरला हलविण्यात आले असून इतर चार जणांवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाच कुटुंबातील पाच जण मृत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डोणगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळवे अधिक तपास करीत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी रूग्णालयात जाऊन जुमडे परिवाराची भेट घेतली.