अपहारप्रकरणी पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्तमजूरी

12


सामना प्रतिनिधी । नगर

आरोग्य विभागात रोजंदारीवर बोगस कर्मचारी दाखवून त्यांचे पगार, दिवाळी बोनस व महागाई भत्त्याच्या रकमेचा सुमारे साडेपाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी महापालिकेच्या (तत्कालीन नगरपालिका) पाच अधिकारी, कर्मचार्‍यांना न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 29 वर्षांपूर्वीच्या या अपहार प्रकरणात दोषी असलेल्यांपैकी चार जण निवृत्त झाले असून, कार्यरत असलेल्या स्वच्छता निरीक्षक बी. एच. भोर यांना महापालिकेने सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती उपायुक्त प्रदीप पठारे यांनी दिली.

तत्कालीन नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कोंडवाडा उभारणी, नाले-गटार सफाई यासह विविध कामांसाठी रोजंदारीवर मजूर नियुक्त करुन कामे करुन घेतली जात होती. 1989 ते 1993 या कालावधीत कोंडवाड्याची उभारणी, नाले व गटारींची सफाई, सण-उत्सव काळातील कामे अशी विविध पाच ठिकाणी रोजंदारीवर मजूर नियुक्त करुन कामे करण्यात आली होती. त्यात रोजंदारीवर 327 मजूर बोगसपणे नियुक्त केल्याचे दाखवून त्यांचे बोगस पगार, दिवाळी बोनस व महागाई भत्त्याच्या रकमेपोटी साडेपाच लाख रुपये अदा करण्यात आले होते. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रत्यक्ष कर्मचारी नियुक्त न करताच नातेवाईकांची व काही बोगस नावे टाकून पगार, बोनस व महागाई भत्त्यापोटीच्या रकमेचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तत्कालीन प्रशासन अधिकारी सी. व्ही. गुजराथी यांनी या प्रकरणाची चौकशी करुन पोलिसांकडे अहवाल सादर केला. पोलिसांनी 2006 मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर 2014 पासून न्यायालयात सुनावणी होऊन लेखापरीक्षक पी. आर. गोरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एल. एम. शिंदे, स्वच्छता निरीक्षक बी. एच. भोर, मस्टर क्लार्क एम. एम. खपके, त्यांचा मदतनीस जी. एस. शिदोरे या पाच जणांना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 40 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या पाच जणांपैकी बी. एच. भोर वगळता उर्वरीत चारही जण सेवानिवृत्त झालेले आहेत. भोर हे कार्यरत असल्याने व त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त पठारे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या