पाच वर्षांचा चिमुकला रेल्वेतून पडून वाचला


सामना प्रतिनिधी । लासूर स्टेशन

पालकांसोबत ठाण्याला जाणारा ५ वर्षीय चिमुकला प्रवाशाच्या बॅगचा धक्का लागून चालत्या रेल्वेतून खाली पडला. दैव बलवत्तर म्हणून तो बचावला.

सिद्धार्थ शंकर पवार (५, रा. वैपना (बु.) ता. हदगाव, जिल्हा नांदेड) हा वडील व काकांसोबत सैलानी बाबाचे दर्शन करून जालन्याहून ठाण्याला जात होता. प्रवाशाच्या बॅगचा धक्का लागून तो रेल्वेतून खाली पडला. ही माहिती मिळताच रेल्वे सेनेचे संतोष सोमाणी, पोलीस व रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले.

सिकंदराबाद – मुंबई (१७०५८) देवगिरी एक्स्प्रेस रात्री १२:२० च्या सुमारास मनमाडकडे जात असताना लासूर-करजगाव रेल्वेस्टेशनदरम्यान सिद्धार्थ रेल्वेतून खाली पडला. लहान मुलगा खाली पडल्याचे प्रवाशांनी ओरडून सांगितले. रेल्वेतून सिद्धार्थला पहाटे लासूर रेल्वेस्टेशनवर आणण्यात आले. पुढील उपचारासाठी मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसने संभाजीनगर येथे आणण्यात आले. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहे.

सिद्धार्थ रेल्वेतून पडल्याची माहिती मिळताच रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे (संभाजीनगर ग्रामीण) पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मुंडे, पोलीस कर्मचारी विनोद बिघोत, बळीराम भताने, राहुल वडमारे, सोमनाथ तायडे, रेल्वे नियंत्रण कक्षप्रमुख गिरगावकर, रवी मीना, लासूर स्टेशनमास्तर प्रमोदकुमार, शरद खरात, ओमप्रकाश पासवान यांनी त्याचा शोध घेऊन रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.