लिफ्टमध्ये अडकून पाच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

1

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यात इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून एका पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नशरा रहेमान खान (5) असे मृत मुलीचे नाव आहे. शनिवारी नशरा नाना पेठेतील मोमीनपूरा येथे तिच्या आजीकडे गेली असता ही दुर्घटना घडली आहे. मोमीनपूरा येथील झोहरा कॉम्पलेक्स इमारतीमधील लिफ्टमध्ये अडकल्याने नशरा गंभीर जखमी झाली होती. यावेळी अग्निशमन दलाचे जवान आणि नागरिकांनी तिला बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

पुण्यातल्या मोमीनपूरा येथील झोरा कॉम्पलेक्‍स या आठ मजली इमारतीमध्ये नशराची आजी राहते. नशरा तिच्या आई-वडिलांसोबत शनिवारी आजीकडे आली होती. त्यावेळी खेळता खेळता नशरा लिफ्टमध्ये गेली आणि लिफ्ट व चौथ्या मजल्यावरील भिंतीमध्ये अडकली. दरम्यान, नशरा दिसत नसल्यामुळे पालकांनी तिची शोधाशोध केली असता नशरा लिफ्टमध्ये अडकल्याचे निदर्शनास आले. रहिवाशांनी तत्काळ अग्निशमन दलाला बोलावून तिला बाहेर काढले व रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत नशराचा मृत्यू झाला होता. नशराच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.