रोहित पक्ष्यांना भेटूया

विद्या कुलकर्णी, पक्षीतज्ञ,[email protected]

येत्या १ एप्रिलला मुंबईत रोहित पक्ष्यांना अगदी जवळून बोटीत बसून पाहायची संधी मिळणार आहे.

फ्लेमिंगो बोट सफारी… दरवर्षी हिंदुस्थानात येणाऱया पाहुण्या फ्लेमिंगोचे सगळ्यांनाच आकर्षण असते. या पक्ष्यांना आता पक्षीप्रेमींना जवळून पाहता येणार आहेत. कारण आय नेचरवॉच फाऊंडेशनने १ एप्रिलपासून ‘फ्लेमिंगो बोट सफारी’ सुरु केली आहे. विशेष म्हणजे या सफरीतील पहिल्या दोन आठवड्याची बुकिंग फुल झाली आहे. ही अनोखी सफर अनुभवण्यासाठी पक्षीप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत असून महिन्यातील प्रत्येक शनिवार-रविवार असणार असून मे महिन्यापर्यंत त्याचा आनंद पक्षीप्रेमींना घेता येणार आहे. या सफरीबरोबरच पक्षीप्रेमींना खाडीचे महत्व, कांदळवन याचीही माहिती देण्यात येणार आहे. या सफरीमध्ये अन्य पक्षीही दाखवण्यात येणार असून नवी मुंबई ऐरोली येथील कोस्टल ऍण्ड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर येथे सकाळी १०.४५  पासून सुरुवात होणार असल्याचे आय नेचरवॉच फाऊंडेशनचे संचालक आयसॅक केहिमकर यांनी दिली.

रोहित पक्ष्यांच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबईकर सुखावतो. एखाद्या चित्रकाराने आपल्या कल्पनाशक्तीतून रेखाटलेला असावा असा हा अतिशय सुंदर पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहित पक्ष्याचे अतिशय तेजस्वी पंख गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाचे असतात. ते फक्त आपल्या आनंदासाठीच अस्तित्वात आहेत असे वाटते, परंतु खरं तर ते पहिल्यांदा गुलाबी नसतात. पिल्लांची पिसे पांढऱया रंगाची असतात व ती राखाडी होतात आणि नंतर त्यांच्या आहारातून मिळणाऱया सर्व प्रकारची अल्गी, छोटे मासे, सर्व प्रकारचे किडे, पाण्यातील जीवाणू आणि बीटा कॅरोटीनमधून गुलाबी रंग घेतात. जगामध्ये मुख्यत्वे उष्ण कटिबंधात हा पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठय़ा प्रमाणावर यांची वस्ती आहे. हजारोंच्या संख्येने यांचे थवे आढळून येतात. हिंदुस्थानात पण हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो. हा पाणथळ जागी थव्याने राहणारा पक्षी. छोटा रोहित व मोठा रोहित या दोन जाती  हिंदुस्थानात सापडतात. रोहित पक्षी भारतात स्थानिक स्थलांतर सुद्धा करतात. बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील रहिवासी आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये गुढगाभर उथळ पाणी असते अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात व पिल्लांना वाढवतात.पाणी व ऊन पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते त्यामुळे पिल्लांचे पालनपोषण चांगले होते. तसेच कच्छचे रण मानवी वस्तीपासून दूर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते. ज्या भागात रोहित पक्षी अंडी घालतात त्या भागाला कच्छमध्ये रोहित पक्ष्यांचे शहर असे म्हणतात.

flamingo-4काही विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. हे या पक्ष्याचे वैशिष्टय़ आहे. रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत वैशिष्टय़पूर्ण असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात. स्थलांतरित होणारे बहुतांश रोहित पक्षी प्रजननासाठी त्यांच्या मूळ कॉलनीमध्ये परत जातात. तथापि काही शेजारच्या कॉलनीमध्ये सामील होतात.

जेव्हा रोहित पक्षी स्थलांतर करतात तेव्हा ते प्रामुख्याने  रात्री करतात. ते निरंकुश आकाश आणि अनुकूल शरद ऋतूतील प्रचलित वारा यांच्या दिशेने टेलविंडसह उडणे पसंत करतात. ते एका रात्री सुमारे अंदाजे ६०० किमी प्रवास करू शकतात. दिवसा ५० ते ६० किलोमीटरच्या वेगाने प्रवास करत जास्त उंचीवरून उडतात, शक्यतो ईगल्सची कुरघोडी टाळण्यासाठी.

छोटय़ा रोहित पक्ष्याची चोच ही काळसर असून फक्त टोक लाल असते. मान व पाय खूप लांब असतात तर वाकडी चोच व मोठा पिसारा असतो. छोटा रोहित पक्षामध्ये काळी किनार असलेले असंतुलित गुलाबी पंख आहेत आणि खोल किरमिजी रंगाचे पाय आहेत. डोळे नारिंगी- पिवळे आहेत आणि लाल रंगाने वेढलेले आहेत. मोठा रोहित पक्षी हा रंगाने थोडा वेगळा असतो. मोठय़ा रोहित पक्ष्याची चोच हलकी गुलाबी आहे व त्याचे टोकच फक्त काळे असते. मोठय़ा रोहित पक्ष्याचे रूप जास्त मोहक नाजूक असते, त्यांची जास्त वस्ती नळ सरोवर, कच्छच्या रणमध्ये आहे. थंडीच्या दिवसांमध्ये लाखोंनी लोक त्यांना बघण्यासाठी जातात. त्यांचे आकारमान मात्र छोटा रोहित व मोठा रोहित एकत्र बघितल्याशिवाय फरक कळू शकत नाही.

अशा या माझ्या अतिशय लाडक्या पक्ष्यांचे मी असंख्य फोटो काढले आहेत, ते तुम्हाला बघावयास नक्की आवडतील!!!

पावसाळ्यानंतर कच्छमध्ये पाणी जेव्हा आटते तेव्हा रोहित पक्षी स्थानिक स्थलांतर करतात व देशभर पसरतात. पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अशा उथळ जागा आहेत. तेथे हिवाळ्यात व उन्हाळ्यात कधी कधी रोहित पक्षी आढळून येतात.