गडचिरोलीमध्ये पावसाचे थैमान, दोन जण गेले वाहून

सामना ऑनलाईन । गडचिरोली
गडचिरोलीमध्ये गेल्या चार दिवसांपासून तुफान पाऊस कोसळत असून अहेरी तालुक्यातील कोत्तादुड नागेश मलय्या कावरे(२२) आणि पुसुकपल्ली गावातील मल्लेश पोचालू भोयर(५५) ही दोघे जण वाहून गेली आहेत.

गडचिरोलीमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. जिमलगट्टा गावापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेला किष्टापूर नालाही ओसंडून वाहू लागला. बुधवारी संध्याकाळी नागेश आपल्या भावासह शेतावर गेला होता. गावाकडे परत येताना दोघेही नाला पार करतेवेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यातून नागेशचा भाऊ कसाबसा बाहेर पडला. मात्र, नागेश पुरात वाहून गेला.

दुसरीकडे निलमगुडम येथेही मल्लेश भोयरही शेतावरुन गावाकडे परत जात असताना वाटेतील निलमगुडम नाला पार करताना वाहून गेला. दोन्ही घटनांविषयी पोलीस आणि महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांच्याही मृतदेहांचा शोध सुरु आहे. मात्र चोवीस तास उलटूनही अद्याप दोघांचाही शोध लागलेला नाही.

दरम्यान, गडचिरोलीमधील अहेरी आणि इतर तालुक्यांतील गावांमध्ये रस्ते उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांना पायवाटेने नाले पार करुन ये – जा करावी लागते त्यामुळे असे अपघात नेहमी होतात. त्यामुळे प्रशासनाने येथील नागरिकांना मुलभुत सुविधा पुरवण्याची मागणी होत आहे.