कोल्हापूर जिल्ह्याला अखेर महापूराने गाठले


सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिह्याला अखेर महापूराने गाठले आहे. नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे तब्बल ९० हुन अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रिय महामार्गासह १० राज्यमार्ग, २३ प्रमुख जिल्हामार्ग, ११ ग्रामिण असे साठहुन अधिक मार्ग बंद झाले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील ब्रिटीश कालीन शिवाजी पुल हा सुद्धा सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आला, तर याच मार्गावर केर्लीनजीक रेडेडोहचे पाणी रस्त्यावर आल्यानेही हा राष्ट्रिय मार्ग बंद झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास पंचगंगा नदीची पातळी ४१ फुट ११ इंच असलेली पातळी सायंकाळी सहाच्या सुमारास ४२ फुट ७ इंचावर पोहोचली होती. नदीची धोका पातळी ४३ फुट असल्याने,नदी काठच्या गावांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे शहरातील सांडपाणी तसेच नाल्यांच्या पाण्याला फुग आल्याने, हे पाणी शहराच्या काही भागात घुसु लागली आहेत. जयंती नाला लगतच्या सुतारमळा परिसरात पुराचे पाणी आल्याने तेथील पाच कुटुंबातील २२ नागरिकांना महापालिका प्रशासनाकडुन दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात स्थलांतरित करण्यात आले. दोन-तीन तासाला पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने अन्य नागरिकांनाही खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या असुन, महापालिकेकडुन पुरबाधीत भागात वैद्यकीय पथकांची नेमणुक करण्यात आली आहे.

जिल्हयात-दिवस रात्र कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवनावर कमालीचा परिणाम झाला आहे. जिल्हयातील प्रमुख धरणांपैकी असलेले राधानगरी धरण ९१.१६, वारणा – ८५.१३, दुधगंगा – ७९.७२ टक्के भरली असुन, राधानगरी धरणातुन १६००, वारणेतुन १८ हजार १७२, कडवीतुन १३८८, कासारीतुन २२५० क्युसेक्स विसर्ग सुरु होता. धरणक्षेत्रात पावसाचा जोर किंचितसा कमी झाला असला, तरी अधुन मधुन कोसळणाऱ्या पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ होताना दिसत होती. जांबरे, घटप्रभा, कोदे ल. पा. हे लघु प्रकल्प यापुर्वीच शंभर टक्के भरले असुन, उर्वरित धरणेही ८० ते ९५ टक्के भरली आहेत.

कृष्णा-वारणा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर तसेच सांगली जिह्यात गेल्या आठवडाभरापासुन सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कृष्णा नदीतील पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ झाली आहे. कोयना धरणात ७६.०८ टिएमसी पाणीसाठा झाला असुन २ हजार १०० क्युसेक्स विसर्ग सुरु आहे, तर वारणा धरणात २९.२९ टिएमसी पाणीसाठा झाला असुन १३ हजार ८८५ क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. शिवाय कोल्हापूरातील पंचगंगेचाही विसर्ग होत असुन, धरणांखालील सर्व गावांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले आहे. धरणांतुन वाढणारा विसर्ग आणि नदी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदीकाठची गावे, वाडय़ा ,वस्त्यामध्ये राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडुन देण्यात आला आहे. शिवाय वीज, मोटार, इंजिने, शेती अवजारे, तसेच पशुधन यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहनही कोल्हापूर, तसेच सांगली येथील पाटबंधारे विभागाकडुन करण्यात आले आहे.

इचलकरंजीच्या नागरी वस्त्यांमध्ये पंचगंगेचे पाणी

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी झपाटय़ाने वाढत असून, महापुराचे सावट घोंघावू लागले आहे. नदीपात्रात ६५.७ फुटावर पाणी वाहत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यामुळे रेंदाळ, हुपरीकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. नदी तीरावरील वरद विनायक मंदिरात पाणी सुमारे ९ फूट साठले असून स्मशानभूमीतही पाणी वाढले आहे. लक्ष्मी दड्ड, वीट भट्टी भाग, जुना चंदूर रोड आदी भागात पाणी शिरले असून, पालिकेची पूर नियंत्रण व्यवस्था सतर्क झाली आहे.

ताम्रपर्णीचे पाणी बेळगाव रस्त्यावर

चंदगड : तालुक्यातील बोळगाव मार्गावरील दाटे येथे ताम्रपर्णी नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतुक खंडीत झाली. मंगळवारी सकाळी पडलेल्या मोठय़ा पावसामुळे ताम्रपर्णी नदी, तसेच घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. मंगळवारी ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे बेळगाव मार्गावरील दाटे या ठीकाणी नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील वाहतुक ठप्प झाली.

नृसिंहवाडीचे दत्तमंदीर पाण्याखाली

शिरोळ : गेल्या चार दिवसापासून शिरोळ तालुक्यात धुवांधार पावसामुळे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून, येथील दोन्ही नद्यांना पूर आला आहे. पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाचा जोर असल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने तालुक्यात पुराची गंभीर स्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर, कुरुंदवाड अनवडी नाला शिकलगार वसाहत, बस्तवाड रोड याचबरोबर खिद्रापूर राजापूर आदी गावांना भेट देऊन पुराची पहाणी करून सर्वाना सतर्कतेचे राहण्याचे आवाहन केले आहे. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली असून, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. शिरढोन, औरवाड (जुना पूल) हेरवाड -लाट मार्गावरील ओढा पाण्याखाली गेल्याने जवळपास १० गावचा संपर्क तुटला आहे.