केरळ बुडाले, शंभर वर्षांतील भयंकर महापुराचा प्रकोप


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली/थिरूवनंतपुरम

शतकातील सर्वात भयंकर महापुराच्या प्रकोपाने केरळ अक्षरशः बुडाले आहे. निसर्गाने नटलेले हे राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून आतापर्यंत 357 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो घरे कोसळली, तर 3.50 लाखांवर लोक बेघर झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि 80 धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे शेती, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. तब्बल 19 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

केरळमध्ये जूनच्या सुरुवातीपासूनच नेहमीप्रमाणे पावसाने जोर धरला. पण या वर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने रौद्ररूप धारण केले. दिवसेंदिवस पावसाचा प्रकोप वाढत गेला. ऑगस्टमध्ये तर महाप्रकोप झाला आहे. 8 ऑगस्टपासून आतापर्यंत तब्बल 194 लोकांचा बळी पावसाने घेतला आहे. केरळला तातडीने पॅकबंद अन्नपुरवठ्याची गरज आहे. सामाजिक, स्वयंसेवी आणि व्यावसायिक संस्थांशी सरकारने समन्वय साधला आहे. केरळला मदत करण्यासाठी एका पथकाची स्थापना केली आहे.

राजस्थान वेल्फेअर असोसिएशनकडून 51 लाख आणि जितो इंटरनॅशनलकडून 51 लाखांची मदत जाहीर केली आहे. 11 टन अन्न आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यातील 6 टन अन्नपुरवठा आज केरळला रवाना होणार आहे.

12 जिल्हे उद्ध्वस्त; रेडअॅलर्ट जारी
केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हय़ांमध्ये पूरस्थिती गंभीर असून राज्य सरकारने ‘रेडअॅलर्ट’ जारी केला आहे. सर्व नद्या तुडुंब वाहत असून 80 धरणांचे दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. शंभर वर्षांतील सर्वांत मोठ्या महापुराचा तडाखा केरळला बसला आहे. गुरुवारी एकाच दिवशी 106 लोक मृत्युमुखी पडले. मृतांची संख्या 357 वर गेली आहे. उद्ध्वस्त झालेल्या केरळच्या नुकसानीचा आकडा 19 हजार 512 कोटी रुपये असल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी दिली.

पंतप्रधान मोदींनी केली 500 कोटींच्या मदतीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूरगस्त केरळची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्री विजयन त्यांच्या बरोबर होते. पाहणीनंतर पंतप्रधानांनी थिरुवनंतपुरम येथे बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. केरळला तातडीची मदत म्हणून केंद्र सरकारकडून 500 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री विजयन यांनी महापुरामुळे केरळचे नुकसान 19 हजार 512 कोटी रुपयांचे झाल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 12 ऑगस्ट रोजी केरळचा हवाई दौरा करून 100 कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील सरकारी अधिकाऱ्यांकडून एक दिवसाचे वेतन
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याची घोषणा महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांनी केली. राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकारी एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देतील. एक दिवसाच्या वेतनाच्या माध्यमातून सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पूरग्रस्तांच्या मदतनिधीत जमा होईल, असे महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई म्हणाले.

काँग्रेस आमदारांचे एक दिवसाचे वेतन
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे आमदार केरळमधील पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देतील, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार एक दिवसाचे वेतन पक्षाकडे जमा करतील. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना दिले आहे.

जवानांच्या शौर्याला सलाम; घराच्या छतावर चॉपर उतरविले
चहूबाजूने महापुराचा वेढा असताना शौर्यचक्र विजेते कॅप्टन पी. राजकुमार यांनी गर्द झाडीमधून वाट काढीत हवाई दलाचे सी किंग -42 बी हे चॉपर चक्क घराच्या छतावर उतरविले आणि 32 जणांना एअरलिफ्ट करून प्राण वाचविले.

पंतप्रधानांची हवाई पाहणी, 500 कोटींची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई पाहणी करुन केरळला 500 कोटींची मदत जाहीर केली आहे.

मदतीचा हात
महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला महाराष्ट्र सरकारने 20 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय केरळला अन्न पुरवठय़ासह इतर आवश्यक साधनसामग्री पुरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. बिहार सरकारकडून 10 कोटी, झारखंड 5 कोटी, पंजाब 10 कोटी, गुजरात 10 कोटी, तामीळनाडू सरकारकडून 5 कोटींची मदत जाहीर केली आहे.