नागालँडमध्ये महापूरामुळे तीन जिल्ह्यांचा संपर्क तुटला

सामना ऑनलाईन । कोहिमा

केरळनंतर आता नागालँडमध्ये महापूराने थैमान घातले आहे. आतापर्यंत विविध दुर्घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थितीचा आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी एक केंद्रीय पथक नागालँडमध्ये दाखल झाले आहे. या पथकात विविध मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहससचिव के.बी. सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पथक मंगळवारी नागालँडमध्ये पोहचले आहे. या पथकाने दीमापूरचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खराब हवामानमुळे हे पथक किफिरे गावापर्यंत पोहचू शकले नाही. या गावाचे पूरामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यातील तुएनसँग, किफिरे आणि फीक या जिल्ह्यांचा 15 दिवसांपासून संपर्क तुटला आहे. सुमारे 600 गावांना पुराने वेढले आहे. राज्यातील सुमारे 359 रस्ते पाण्याखाली गेल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्याच आले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत 3 हजारे कुटुंबे बेघर झाली असून कोट्यवंधीच्या मालमलत्तेचे नुकसान झाले आहे. संपर्क तुटलेल्या 600 गावांशी पुन्हा संपर्क स्थापन करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर येण्यासाठी राज्याला 800 कोटींची गरज आहे, असे राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तर दुर्घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 530 गावातील 50 हजार नागरिकांशी संपर्क तुटला आहे. नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी पूरपरिस्थितीबाबत सोशल मिडीयावर मदतीसाठी केलेल्या आवाहनानंतर केंद्र सरकारने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने पथक रवाना केले आहे. पूरपरिस्थितीने राज्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्याला मदत करण्याचे आवाहन रिओ यांनी सोशल मिडियावर केले होते. आसाममध्येही चार जिल्ह्यांना पूराने वेढले आहे. तर 12 हजार जणांचा पूराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आसामला पुराचा धोका वाढला आहे.