तुझ्या किडनीपासून निरनिराळे पदार्थ बनवीन, प्रेयसीने प्रियकराला पाठवले लाखो मेसेज


सामना ऑनलाईन। फ्लोरिडा

एका धनाढ्य प्रियकराबरोबर ब्रेकअप झाल्याने चिडलेल्या प्रेयसीने त्याला 1 लाख 59 हजार मेसेज करून त्याचा मानसिक छळ केल्याची घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडली आहे. तुझ्या किडनीपासून निरनिराळे पदार्थ बनवीन, तुझ्या रक्ताने आंघोळ करीन, अशा प्रकारचे मेसेज पाठवून तिने प्रियकराचा मानसिक छळ केला. यामुळे तिला अटक कऱण्यात आली आहे. जॅकलीन एडीस असे तिचे नाव आहे.

हे प्रकरण 2017 सालचे आहे. डेट साईटवर जॅकलीनची मैत्री एका धनाढ्य तरुणाबरोबर झाली होती. त्यानंतर दोघे डेटींगलाही गेले. पण त्यानंतर तरुणाने तिच्याशी बोलणे बंद केले. मैत्री येथेच संपवत असल्याचा तिला मेसेज पाठवला. यामुळे अपमानित झालेल्या जॅकलीनने त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने त्याच्या घराबाहेरच आंघोळ करण्याचा प्रताप केला. एवढेच नाही तर ती एकदा त्याची पत्नी असल्याचा बनाव करत त्याच्या ऑफिसमध्येही गेली. तिथे तिने तमाशा केला. पण एवढे करुनही प्रियकर आपल्याला भेटत नसल्याने ती अधिकच चवताळली. त्यातूनच मग तिने त्याला 1लाख  59 हजार मेसेज पाठवले. प्रत्येक मेसेज मध्ये ती त्याला धमकावत होती. तुझ्या किडनीपासून निरनिराळे पदार्थ बनवीन, तुझ्या रक्ताने आंघोळ करीन, तुझ्या हाडाचा चॉपस्टीक सारखा वापर करीन असे मेसेज ती त्याला पाठवून त्रास देऊ लागली. अखेर कंटाळलेल्या मित्राने 2017 जुलैला तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. पण ही घटना आता प्रसिद्धी माध्यमांसमोर आली आहे.