फुलांचा उत्सव

डॉ. कांचनगंगा गंधे

पाऊस ओसरून सृष्टी आता फुलांचा शेला पांघरून सजली आहे. आपल्या महाराष्ट्रातील पुष्पवैभव. कास पठार, कर्नाळा अभयारण्य, वाई येथील तापोळा, भिमाशंकर, डोंगरवाडी, कामशेत, लोहगड, भंडारदरा, अंबाघाट प्रतापगड, शिवनेरी, राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा, तुंग या किल्ल्यांवरही या दिवसांत असाच पुष्पोत्सव सुरू असतो. कोल्हापूरजवळ झोळंबे, कोयनेचे जंगल येथे वेगवेगळी फुले पाहायला मिळतात. कोकण आणि सह्याद्रीला जोडणारे घाट वरंधा, कुंभार्ली, आंबा, राधानगरी, आंबोली रानफुलांनी बहरलेले असतात. मुंबईकर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाऊनही रानफुलांचा आनंद घेऊ शकतात.

पाण तेरडा…फक्त ओल्या खडकांवर आणि धबधब्यांवर ही फुले आढळतात. गुलाबी पांढरट अशा रंगाची ही फुले साधारण पाचगणीच्या धबधब्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतात.

lavander-flowers

जांभळी चिरायत…ही फुले जांभळ्या रंगाची असतात. एक फुटाच्या आसपास ही रोपे असतात. सिंहगडाच्या मागच्या बाजूला, कास पठारावर आणि पाणथळ जागेवर ही फुले आढळून येतात.

नभाळी…निळसर जांभळा तुरा असलेलं हे फूल दगडांवर साचलेल्या मातीवर वाढतं. याच्या दोन जाती सह्याद्रीत जास्त पहायला मिळतात. एकाचं नाव नभाळी आणि दुसऱयाच निळवंती. निळवंतीच्या पानावर केस असतात हाच काय तो फरक.

खाजकांदा…ही जांभळ्या रंगाची फुले असतात. त्याचे कांदे जमिनीत येतात. सदाहरित जंगलात, खंडाळा या ठिकाणी ही फुले आढळतात.

डिपकाडी…डिपकाडी ही वनस्पती कास पठारचे वैशिष्टय़ आहे. डिपकाडी पांढरट हिरवट येतात.

nilgiri-flower

निलगिरी हळद…पानथळ जंगलात होते. माळशेज घाटात ही फुले दिसतात. ही फुले पिवळ्या रंगाची असतात.

सितेची वेणी….ही वेणी जाड आणि मांसल असून गुलाबी-जांभळ्या रंगाची फुले असतात. याला ऑर्किडही म्हटले जाते. लोणावळ्यात डोंगराच्या उतार भागात ही बाणगुळं पाहायला मिळतात.

कारवी जांभळी…डोंगरउतरांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती. सात वर्षाने ही फुले फुलतात. मुळशी, लोणावळा या भागात आढळून येते.

sontara

सोनतारा….सोनतारा हे पिवळ्या रंगाचे फूल आहे. मुळशी, पाचगणी, महाबळेश्वर, ताम्हणी घाटात ही फुले आढळतात.

छोटा कल्पा….ही पांढरी फुले आहेत. गवताळ भागात ही फुले आढळतात. या फुलांची छोटी रोपटी असतात. हिच्या कळ्या मोदकाच्या आकाराच्या असतात, पाने, फांद्या, कळ्यांवर लव असते. शुष्क गवताळ रानात आढळतात.

काळी मुसळी….लांबट सुपारीसारख्या पानांमधून पिवळ्याधमक पाच पाकळ्यांचं छोटंसं फूल उठून दिसतं. कोकण, टेकडीच्या खाली ही फुले आढळतात.

वायतुरा…पाणथळ जागी बारीक गुलाबी-फिक्या जांभळ्या रंगाचे हे वायतुरा फूल. ही वनस्पती केवळ या पठारावरच आढळते. जुलैमध्येच फुलणारी ही वितभर उंचीची वनस्पती, हिरव्या पानांचा काही भाग गेला की मधोमध ‘वाय’ आकाराचा एक तुरा फुलतो.

रानहळद…विस्तीर्ण पठारावर केळीच्या पानांसारखे कोंब जमिनीतून बाहेर पडतात आणि गुलाबी अथवा जांभळ्या रंगाचा फुलोरा जमिनीलगत वाढतो, हीच रानहळद.

गेंद…हे फूल पांढऱया रंगाचे असून चेंडूच्या आकारासारखे असते. कास पठारावर हे फूल पाहायला मिळते.

कुमूद…सह्याद्रीच्या पठारांवर आणि विशेषतः जिथे स्वच्छ पाण्याची उथळ तळी आहेत अशा ठिकाणी हे फूल मिळते. कुमूद ही तशी पाण्यातील वनस्पती, त्यामुळे साहजिकच उथळ पाण्यामध्ये आणि मोकळा गाळ असलेल्या ठिकाणी चांगली वाढते. कुमूदची फुले कमालीची सुंदर असतात. खोडातून हिरव्या रंगाचा मांसल देठ वाढतो आणि त्यावर साधारणपणे ३ ते ५ सेंटीमीटर व्यासाचे पांढऱयाशुभ्र रंगाचे फूल लागते. प्रत्येक फुलात सहा पाकळ्या असतात. प्रत्येक पाकळीच्या किनाऱयावर पांढऱया रंगाचे दाट केस असतात.