कल्याण-डोंबिवली तापाने फणफणली, चार महिन्यांत 23 हजार रुग्ण


सामना प्रतिनिधी । कल्याण

पावसाळा सुरू झाल्याबरोबर कल्याण-डोंबिवलीत साथीच्या आजारांनी हात-पाय पसरण्यास सुरुवात केली ती आजतागायत कायम आहे. गेल्या चार महिन्यांत तापाने फणफणलेल्या रुग्णांची संख्याच तब्बल 22 हजार 870 च्या घरात गेल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. शिवाय डेंग्यूबाधित रुग्णही वाढत असून या रुग्णांची संख्या 890 च्या घरात गेली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने साथीच्या आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मात्र तरीही तापाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. हवामान बदलामुळे व्हायरल जोमाने फैलावत असल्याचे कारण आरोग्य विभागाने दिले आहे. तसेच डेंग्यूच्या डासांना हे वातावरण पोषक असून स्वाईन फ्लूसुद्धा कधीही डोके वर काढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रेल्वे स्थानकातून संसर्गजन्य लागण
कल्याण रेल्वे स्थानकात रोज हजारो प्रवासी राज्यभरातून आणि देशभरातून येतात. त्यांच्यामुळेच संसर्गजन्य रोग पसरत आहे. याचमुळे स्वाईन फ्लू, कावीळ, गैस्ट्रो, मलेरिया, डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

… तर तातडीने दवाखाना गाठा
प्रचंड उष्मा, हवामान बदल, ऊन-पावसाचा खेळ, दूषित पाणी, अस्वच्छता यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवने, ताप, उलटी यापैकी एक जरी लक्षण आढळल्यास खबरदारी म्हणून तातडीने दवाखाना गाठा आणि तपासणी व इलाज करून घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आजारनिहाय रुग्ण
ताप – 22870,
गॅस्ट्रो – 232,
स्वाईन फ्लू – 7,
कावीळ – 218,
टायफाईड – 527,
मलेरिया – 198,
डेंग्यू – 890,
लेप्टो- 11.

  • सात हजार घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी.
  • लहान मुलांसाठी दवाखान्यामध्ये स्वतंत्र उपचार कक्ष.
  • प्रत्येक प्रभागात डास प्रतिबंधक, जंतुनाशक फवारणी.
  • पालिकेच्या दवाखान्यात रुग्णांसाठी मोफत औषधे.
  • पालिकेचे दवाखाने 24 तास सुरू राहणार.