वेब न्यूज : उडते लाँचिंग पॅड

>> स्पायजडरमॅन

अंतराळात सॅटेलाईट्स अथवा रॉकेट्स सोडणे ही आता हिंदुस्थानसाठी काही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांतली इस्रोची कामगिरी तर या क्षेत्रात डोळ्यात भरण्याजोगी आहे. देशाबरोबरच परदेशातील अग्रणी देशांची सॅटेलाईट्सदेखील अंतराळात यशस्वीपणे सोडण्याची कामगिरी इस्रोने पार पाडलेली आहे. मात्र आता या उड्डाणाच्या क्षेत्रात काही नवे, काही अद्भुत घडते आहे. जमिनीवरून सोडली जाणारी सॅटेलाईट्स आपण कायम बघतच असतो, पण आता चक्क विमानाचा उपयोग लाँचिंग म्हणून करून अवकाशात काही अंतरावर सॅटेलाईट घेऊन जाणे आणि तिथून त्याचे प्रक्षेपण करणे या भन्नाट कल्पनेवर सध्या काम सुरू आहे. या प्रयोगासाठी वापरण्यात येणारे आणि ‘जगातील सगळ्यात मोठे विमान’ म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे, त्या विमानाने नुकतेच यशस्वी उड्डाण करून या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने भक्कम पाऊल टाकले आहे. तब्बल 385 फूट इतके लांब असलेले या विमानाचे पंख, कोणत्याही अमेरिकन फुटबॉल ग्राऊंडपेक्षादेखील मोठे आहेत. दोन विमाने एकत्र करून हे अवाढव्य विमान बनवले गेले आहे. 170 मैल प्रति तास वेग घेऊ शकणाऱया या विमानाला 6 इंजिने बसवण्यात आलेली आहेत. आपल्या पहिल्याच प्रयत्नात या विमानाने 15 हजार फुटांची उंची गाठण्यात यश मिळवले आहे. ब्रिटनमधील विख्यात अब्जाधीश रिचर्ड ब्रेन्सनच्या ‘व्हर्जिन गेलेक्टिक’ या कंपनीनेदेखील जमिनीपासून काही एक उंचीवर नेऊन सॅटेलाईटला अंतराळात प्रक्षेपित करू शकणारे विमान बनवलेले आहे. मात्र स्ट्रेटोलॉन्चने आता उडवलेल्या विमानाचा हा एकच उद्देश नाही. ज्याप्रमाणे आजकालची प्रवासी विमाने सहजपणे अवकाशात उड्डाण करतात आणि प्रवासी, सामानाची वाहतूक करतात अगदी तेवढय़ाच सोप्या पद्धतीने अंतराळ प्रवास सुरू व्हावा हा यादेखील यामागचा एक प्रमुख हेतू आहे. या विमानाची चाचणी यशस्वी ठरल्याने आता जमिनीवरून अंतराळात कोणतीही वस्तू सोडण्याचा खर्च हा मोठय़ा प्रमाणावर कमी होण्याचा अंदाज लावला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या