अकरावीचा वर्ग ओव्हरफ्लो,भरारी पथकांद्वारे महाविद्यालयांची तपासणी

4

सामना ऑनलाईन, मुंबई

अकरावीच्या वर्गात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे उघड झाले असून अशा महाविद्यालयांची भरारी पथकांद्वारे तपासणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाकडे याविषयीच्या तक्रारी आल्या असून या तक्रारीनंतर हे प्रवेश रद्द करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिले आहेत.

…तरच बारावीची परीक्षा देता येणार

राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावी प्रवेशाची माहिती सरलच्या वेबसाइटवर 30 सप्टेंबरपर्यंत देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. बारावीसाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारताना शिक्षण मंडळाने त्या त्या कॉलेजची प्रवेशक्षमता तपासूनच अर्ज स्वीकारावे, असे आदेशही खरात यांनी शिक्षण मंडळाला दिले आहेत. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

महाविद्यालयातील हजेरी टाळण्यासाठीच

राज्यातील अनेक विद्यार्थी जेईई, नीट, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी लाखो रुपये फी भरून खासगी क्लासेसना प्रवेश घेतले आहेत. मात्र महाविद्यालयांमध्ये 75 टक्के हजेरी अनिवार्य असल्यामुळे या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ क्लासेसना उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शक्कल लढवून ऑनलाइन प्रक्रियेच्या बाहेर ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. मागील काही वर्षांत ग्रामीण भागातील महाविद्यालयांत असे चुकीच्या पद्धतीने प्रवेश दिले जात आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या