उडती खार…

भीमाशंकरच्या अभयारण्यात आढळणारी शेकरू खार महत्त्वाचं आकर्षण आहे. झुबकेदार शेपटीचा तोल सांभाळत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर वेगाने पळणाऱ्या या खारीला उडती खार का म्हणतात ते बघितल्यावरच कळते. पानांच्या आड लपत फळांचा फडशा पाडणारी शेकरू कमालीची लाजाळू असते बरं का…

झाडावर सरसर चढत फांदीवर बसून इवल्याशा दातांनी फळं खाणारी खारुताई किती गोड दिसते ना… आपली झुबकेदार शेपूट सांभाळत अगदी क्षणभरात ती डोळ्यासमोरून दिसेनाशी होते. या खारुताईच्या हिंदुस्थानात खूप प्रजाती आहेत. त्यातीलच एक म्हणजे भीमाशंकर अभयारण्यात आढळणारी शेकरू ही खार. शेकरु म्हणजेच उडती खार. म्हणजे शब्दशः ही उडत नसली तरी ती इतक्या वेगात तुरुतुरु धावत असते की हिला उडती खार असंच म्हटलं जातं. ही खारीची प्रजाती फक्त हिंदुस्थानातच सापडते. भीमाशंकर आणि फणसाडच्या जंगलात या खारी प्रामुख्यानं आढळतात.

शेकरू महाराष्ट्र राज्याचा मानचिन्ह असलेला प्राणी म्हणून ओळखली जाते. इंग्रजीत त्याला इंडियन जायंट स्क्विरल म्हणतात. अतिशय लाजाळू अशी ही खार पानगळतीच्या जंगलात किंदळ, उंबर यांसारख्या झाडांवर हमखास दिसते. जंगलतोडीमुळे तिचा नैसर्गिक अधिवास संकटात सापडला आहे. शेकरू राज्यात भीमाशंकर, फणसाड, आजोबा डोंगररांगा, माहुली, कासोटा, मेळघाट, ताडोबा, पश्चिम घाटात सिंधुदुर्ग ते नाशिक या परिसरातील सदाहरित वने, या प्रदेशात आढळते. भीमाशंकरच्या जंगलात भीमाशंकरी ही राज्यातील इतर शेकरूपेक्षा वेगळी जातही सापडते.

शेकरू शेपटीसह साधारण मीटरभर लांब असते व तिचे वजन दोन ते अडीच किलोपर्यंत असते. गुंजीसारखे लालभडक डोळे असणाऱ्या शेकरूची शेपटी शरीरापेक्षा लांब आणि झुपकेदार असते. तोल सांभाळण्यासाठी या शेपटीचा उपयोग होतो. तपकिरी पाठ, पिकळसर-पांढरा गळा, तोंडावर रुबाबदार लांब मिशा, लांब सुळ्यासारखे दात, पायाला टोकदार काकडी नखे असा रुबाब असलेली शेकरू कितीही उंच झाडावर सरसर चढते. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर वेगाने पळते. एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर सहज झेप घेणारी शेकरू पंधरा ते वीस फुटांची लांब उडी मारू शकते. उंबर, जांभूळ, करवंद, आंबा आणि इतर विविध प्रकारची फळं हे शेकरूचे खाद्य. शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. शेकरू डहाळी व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे शेकरू बनवते. शेकरूंचा नैसर्गिक अधिवास कमी झाल्याने ते दुर्मिळ गटात मोडले जातात. म्हणूनच भीमाशंकर येथे दरवर्षी त्यांची गणना करण्यात येते.

भारतात जायंट स्क्किरल प्रजातीच्या सात उपजाती आढळतात. पैकी ‘राटूफा इंडिका’ (RATUFA INDICA) ही उपजात फक्त महाराष्ट्रात आढळते. भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात शेकरू आढळत असल्याने हे अरण्य शेकरू अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आले आहें.   महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या ‘शेकरू’किषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती आणि त्याच्या जतन व संवर्धनासाठी शेकरूविषयक सविस्तर माहिती असलेले पुस्तकही प्रकाशित झाले आहे.