तमाशा कलावंतांना टोळक्याची मारहाण, 12 जण जखमी

5

सामना ऑनलाईन । नगर

नगरमधील टाकळी-लोणार येथे तमाशा कलावंतांना गावातील एका टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात्रेनिमित्ताने हिरामण बडे- शिवकन्या बडे तमाशा मंडळाच्या फडाचे आयोजन केले होते. मात्र, कार्यक्रम सुरू होण्याआधीच गावातील 20 ते 25 टवाळखोरांनी जबरदस्तीने कलावंतांत्या तंबूत घुसून हुज्जत घातली व नंतर त्यांना मारहाण केली. यावेळी काही महिला कलावंतांचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय. या मारहाणीत महिलांसह 12 कलावंत जखमी झाले आहेत.

टाकळी-लोणार येथे गुरुवारी रात्री यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या तमाशात गावातीलच टवाळखोरांनी कलावंताना जबर मारहाण केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी तमाशा कलावंतांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारे टवाळखोर फरार असून त्याचा शोध सुरू आहे.