भूमिपुत्रांना न्याय मिळावा – लोकशाहीर नंदेश उमप

सामना प्रतिनिधी । मुंबई

निवडणुका जाहीर झाल्या की, तिकीट न मिळाल्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात राजकीय नेत्यांनी उड्या मारणे हे आता कॉमन झाले आहे. राजकारण करताना समाजकारणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, एवढेच माझे सर्व पक्षांना आवाहन आहे. खासकरून महाराष्ट्रात भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले आहे.

मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. खऱ्या अर्थाने ‘सोन्याची मुंबई’ झाल्याने घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आज लालबाग-परळमधला मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला आहे. दुसरीकेै परप्रांतीयांची दादागिरी वाढली आहे. रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीबद्दल वेगळे काही सांगायला नको. मांसाहार खाणाऱ्यांना बिल्डिंगमधून हाकलले जाते. हे सगळं आजूबाजूला बघते तेव्हा खूप दुःख होते. महाराष्ट्रातील मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. उद्योगधंद्यात प्राधान्य दिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोळी बांधव आणि त्यांचे व्यवसाय टिकायला हवेत एवढीच मला लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा आहे.