सॅबीदादा अर्थात उदय सबनीस यांच्या खाण्याच्या गमतीजमती

सामना ऑनलाईन, मुंबई

खाणंया शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय ?  – जगणे म्हणजे खाणे. माझी जगात सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे खाणं. खाण्यात गंमत आणि विविधता आहे.

खायला काय आवडतं ?  – गरम वरण-भात-तूप-लिंबू सगळ्यात जास्त आवडतं. दही भात, मेथीची भाजी-पोळी, ज्वारीची भाकरी-झुणका, खिमा,मटण, मासे

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता ? –  अशोक शिंदे हा नट असला तरी माझ्यासाठी तो आहारतज्ञ आहे. माझं वजन आधी खूप वाढलं होतं. तेव्हा त्याने मला डाएट प्लान करून दिलं. तेव्हापासून मी खातो सगळं प्रमाणात आणि कमी खातो. त्यामुळे वर्षभरात माझं वजन १५ किलो कमी झालं. गेले वर्षभर नकुल घाणेकरकडे सालसा हा नृत्याचा प्रकार शिकतोय.

डाएट करता का ?  – मी स्वतःला खाण्याची बंधन नाही घातली. मात्र एखाद्या नटाच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा असायला हव्यात त्याचं काम कधी आटपतं, त्याने काय आणि कसं खायचं याविषयी अशोक शिंदेने जे मला सांगितलंय ते तंतोतंत पाळतो. गोड खावसं वाटलं तर राजगिऱ्याची चिक्की खातो. यासाठी ऋजुता दिवेकर यांचा सल्ला घेतो. हिंदुस्थानी पदार्थ खा असं त्यांचं म्हणणं आहे. भाजी, आमटीवर जास्त भर देतो. जेवताना दही खातो. चहा दिवसातून एकदाच पितो. प्यावासा वाटलाच तर बिनसाखरेचा चहा किंवा कॉफी पितो.  पाव शक्यतो खात नाही.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता ? – आठवडय़ातून  एकदा.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता ? – ठाण्यात मामलेदारची मिसळ, मेतकूट, मंत्रा, शीतल ग्रील

कोणतं पेय आवडतं ? –  कैरीचं पन्ह आणि ताक

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणंपिणं कसं सांभाळता – कोल्हापूरला प्रयोगासाठी गेलो की, तिथल्या कॉन्ट्रॅक्टरना सांगतो, तिथे भाकरी आणि कमी तेलाच्या पालेभाज्या ते करून आणतात.

स्ट्रिट फूड आवडतं का ? – काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या समोरचा मारुतीचा वडा मला आवडतो. गडकरी कट्ट्यावरची मिसळ, वडा, चहा आवडतं, पण गाडीवरचं काहीही खात नाही.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं ? – माझ्या नाही तर कोणाच्याही घरी केलेले सगळे पदार्थ आवडतात. विशेषतः साबुदाण्याची खिचडी, फोडणीचा भात, पोळीचा कुस्करा, आईने केलेला आळीवाचा लाडू, साबुदाण्याच्या पिठाचा लाडू, थालीपीठ हे पदार्थ खूप आवडतात.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता ? –  हल्ली पाहुण्यांना आपण हॉटेलमध्येच बोलवतो, पण त्यांच्या आवडीप्रमाणे  काहीही खाऊ घालतो. आम्ही मंतरा हॉटेलमध्येच जातो.

उपवास करता का ? – माणसाचा जन्म खाण्यासाठी झालाय असं माझं म्हणणं आहे, त्यामुळे उपवास अजिबात नाही करत.

दलिया डोसे

रात्री 1 वाटी दलिया भिजवायचा. दुसऱया भांडय़ात अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी तांदूळ भिजवून ठेवायचं. दुसऱया दिवशी सकाळी हे सगळं एकत्र मिक्सरमधून काढायचं. 15 ते 20 मिनिटे हे वाटलेलं मिश्रण असंच ठेवायचं. नंतर त्याचे डोसे बनवायचं. खोबरं, मिरची, कोथिंबीरीची चटणी वाटायची. पौष्टिक होतात. त्यातील डाळींमुळे प्रथिने मिळतात. दलियाचा उपमा किंवा उत्तपाही छान होतो. उत्तपा करणार असाल तर त्यावर कांदा, टोमॅटो किंवा कुठलीही चटणी वरून लावायची.