खाण्याची प्रत्येक तऱ्हा Enjoy करतो!

1

अनिकेत पाटील, नाट्य अभिनेता

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय ? – ‘खाणं’ म्हणजे माझ्यासाठी मजा. मी खूप फुडी आहे. फूड सायन्स या विषयात पदवी संपादन केली आहे. त्यामुळे बऱयाच ठिकाणी क्वालिटी कंट्रोल ऑफिसर या पदावर काम केलेलं असल्यामुळे जगात शिजवलेले जाणारे आणि विमानात मिळणाऱया बहुतांशी पदार्थांची चव मी घेतली आहे.

खायला काय आवडतं ?  – चटपटीत जास्त आवडतं. पाणीपुरी, डोसा, शेवपुरी असे चाटचे सगळे प्रकार, इटालियन असे अनेक तऱहेचे चटकदार पदार्थ आवडतात.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता ? – ज्या दिवशी जड पदार्थ खातो त्यानंतर दोन-तीन दिवस फक्त सलाडवरच राहतो. चटपटीत असलं तरीही पौष्टिक खाण्यावर भर असतो. उदा. उकडलेलं चिकन, अंड वगैरे.

डाएट करता का ?  – हो करतो. बऱयाचदा करतो, मात्र सणांच्या वेळी ते पाळलं जात नाही. मध्येच सोडून देतो. यामध्ये प्रोटिन डाएट मुख्यत्वेकरून करतो.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता ? – दोन-तीन वेळा होतं.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता ? – बोरिवलीमधील ‘माँटो’ हॉटेलमध्ये दर पंधरा दिवसांनी एक पदार्थ बदलतो. तिथे जगभरातले प्रसिद्ध पदार्थ खाण्याची संधी मिळते. खाद्यप्रेमी म्हणून तिथले वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात.

कोणतं पेय आवडतं ? – कोकम सरबत

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणंपिणं कसं सांभाळता  ? – तब्येतीवर परिणाम होऊ नये म्हणून प्रयोगानंतरच खातो. कोल्हापूरला गेलो तर तिथली मिसळ खातो. पुण्यात बालगंधर्वची कुल्फी, नाशिक-मुंबई नाक्यावर मिळणारी मिसळ  असे वेगवेगळे पदार्थ आवर्जून खायला आवडतात.

स्ट्रीट फूड आवडतं का ? – ठरावीक ठिकाणी खातो. काही ठिकाणी खरंच चांगल्या चवीचं चाट मिळतं जे आरोग्यदृष्टय़ाही हानिकारक नसतं. बोरिवलीत महावीरनगरमध्ये असलेल्या खाऊगल्लीत मिळणारे चाटचे पदार्थ खायला जातो.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं ? – मासे आणि मटण, शाकाहारी पदार्थात पुलाव आणि पनीर भाजी हे पदार्थ विशेष आवडीचे आहेत.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता ? – शाकाहारी-मांसाहारी बिर्याणी आणि पुलाव, पनीरची भाजी खायला पाहुणे आवर्जून येतात.

उपवास करता का ? –  अजिबात नाही.

ब्लॅक लेमन टी

कपाचं माप घेऊन पातेल्यात पाणी घ्यायचं. त्यात चहा पावडर, आलं, लिंबू घालायचं. चहा पावडर कमी घालायची चहा उकळला की गाळून कपात ओतायचं. डाएट आणि पचनाची हा चहा फारच छान आहे. कधी कधी हा चहा थंड करून त्यामध्ये आइस्क्रिम घालूनही खाता येतं. याला आइस लेमन टी म्हणतात.