अभिनेते प्रसाद पंडित यांची खाण्याची आवड.

सामना ऑनलाईन । मुंबई

– ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – खाणं हे जगण्यासाठी असावं. खाण्यासाठी जगणं असू नये.
– खायला काय आवडतं? – चुलीवरची झुणका-भाकरी, चटणी-भाकरी आवडते. खूप चमचमीत नसलं तरी व्यवस्थित हवं. तिखट-मिठाचं प्रमाण त्यामध्ये आवश्यक तेवढं हवं.

– खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – भूक लागले तेव्हा आपल्या शरीरात पाचक द्रव पाझरत असतो.

त्यावेळी जेवलंच पाहिजे. जेव्हा आपण खातो तेव्हाच आपल्याला जाणीव होते की, किती खायला हवं. तिथे थांबायला हवं.

त्यानंतर खूप चवीचं आहे म्हणून आणखी बकाबका खाऊ नये. आरोग्याला हे अतिशय पूरक आहे. हे तत्त्व मी पाळतो.

– डाएट करता का? – अजिबात नाही. सकाळी नाश्ता करतो. दुपारी दीड ते दोनदरम्यान जेवतो. रात्री साडेनऊ वाजता जेवतो. या वेळांमध्ये काहीही खात नाही. सकाळी आणि संध्याकाळीच चहा घेतो.

-आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – बऱयाचदां, पण वेळेतच होतं.

– कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – दादरमधलं तांब्यांचं आरोग्य भुवन आवडतं.

– कोणतं पेय आवडतं? – लिंबूपाणी.

– प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – प्रयोगानिमित्त बाहेर असतो तेव्हा नव्वद टक्के लिंबू पाणी पितो. दिवसातून तीन लिटर पाणी कुठेही असलो तरी पितो. बिसलरीतलं पाणीच बाहेर असताना पितो. लिंबूपाणी मिळालं नाही तर लिंबूपाण्यात पिळून ते पाणी पितो. कोल्ड्रिंक वगैरे काहीही पित नाही. खान्देशातली कचोरी खायला आवडते. एखाद्या ठिकाणी ठेचा, खर्डा चांगला असेल तर आवर्जून खातो. शक्यतो जिथे जे प्रसिद्ध आहे तेच खातो; पण तेही प्रमाणातच.

– स्ट्रीट फूड आवडतं का? – हो, शेवपुरी खूप आवडते. लहर आली की, कधीतरीच खातो.

– घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – अंडय़ाचं बुजणं, मुळ्याची भाजी आणि तांदळाची भाकरी, चिकनपेक्षा मासे जास्त आवडतात.’

अंडय़ाचं बुजणं
सर्वप्रथम ५ ते ६ अंडी फोडून ठेवल्यानंतर अख्खी राहतील असे एक भांडे घ्यायचे. मंद आचेवर तव्यावर तेल घालून वाफ आली की, त्यावर हिंग, जिऱयाची फोडणी द्यायची. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यायची. एका अंडय़ाला एक कांदा असं घ्या. फोडणीमध्ये आलं, लसूण मिरचीची पेस्ट टाका. त्यावर कांदा टाकून तो परता. कांदा लाल झाला की, तव्यातच उरलेल्या तेलात टोमॅटो परतून घ्या. नंतर कांदा-टोमॅटोच्या पेस्टमध्ये तिखट, हळद, मीठ घालून पुन्हा परता. चिकन मसालाही वापरू शकता. भाकरीसारखा हा लगदा संपूर्ण तव्यावर पसरवायचा. त्यामध्ये भोक करायचं. त्यामध्ये फोडलेलं अख्ख अंडं सोडा. आजूबाजूलाही भोक तयार करून त्यामध्येही अख्खं अंड सोडा. अंडय़ावर थोडं मीठ, हळद, तिखट घालायचं. दहा मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. त्यावर कोथिंबीर घाला. दहा मिनिटांनी गॅस बंद करायचा. या बुजण्याचे पिझ्झासारखे तुकडे करूनही खाऊ शकता.