‘आम्ही खवय्ये’ कोंकणी खाद्यप्रकार

रोहिणी हट्टंगडी

मांसाहार आवडत असला तरी रोहिणी हट्टंगडी साध्या जेवणाला, शाकाहाराला प्राधान्य देतात.

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?– जीवनावश्यक वस्तू.

खायला काय आवडतं? – साधं आवडतं. शाकाहाराला प्राधान्य देते. मांसाहारात अंडी आणि मासे आवडतात.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – तेलकट-तुपकट फारच कमी खाते. हे पाळते. फळं, भाज्या जास्त आवडतात. फळाशिवाय माझा दिवस सुरू होत नाही.

डाएट करता का? – अधूनमधून करावं लागतं. अशा वेळी शक्यतो भाजीपोळी, भात-भाकरी फक्त एकावेळी खाते. दुसऱया वेळी फक्त अंडी-भाज्या खाते.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – असं काही ठरवलं नाही, पण शक्यतो घरचं खायला आवडतं.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – कोणत्याही चांगल्या हॉटेलमध्ये जायला कोणतीच अडचण नसते. शक्यतो चायनीज, इटालियन पदार्थ जिथे असतात तिथे जाते.

कोणतं पेय आवडतं? – निरा आणि नारळपाणी.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा? – काटेकोरपणे सांभाळता येत नाही, पण शक्यतो रात्री प्रयोग असेल तर एखादी भाजीच फक्त खाते. रात्री पोळी आणि भात खाणं टाळते. मसालेदार पदार्थ असतील तर डाळ किंवा सूप घेते. दुपारी प्रयोग असेल तर भात, पोळी, भाकरी यापैकी एकच पदार्थ खाते.

स्ट्रीट फूड आवडतं का ? – गाडीच्या समोर उभं राहून पाणीपुरी खाण्यात मजा असते ती घरी खाण्यात नसते. म्हणून पाणीपुरी बाहेर खायला मला आवडते. त्याशिवाय मजा येत नाही. पती, मुलाला पाणीपुरी आवडायची म्हणून मी करायचे.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं ? – घरी केलेलं सगळंच आवडतं. कारण दुसऱयासाठी करण्यात प्रत्येक स्त्रीचं आयुष्य जातं. त्यामुळे स्वतःला काय आवडतं याचा कधी विचारच होत नाही. माझं तसेच झालं. मला सगळंच आवडतं. कारलं, शेपूची भाजीही आवडीने खाते.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता ? – त्यांना वेगळी चव हवी असेल तर मला कोकणी पदार्थ बनवायला आवडतात. हे पदार्थ सासूबाईंकडून शिकले. बटाटय़ाचं साँग, वाळी आंबट, घश्शी मी बनवते. माझ्या मुलाच्या नॉर्थ इंडियन मुलाला मी केलेलं बटाटय़ाचं साँग खूप आवडतं. आवडीने कुणी खाणारं असेल तर.

 उपवास करता का? – पूर्वी करायचे आता करत नाही.

वाळी आंबट (मायाळूची पातळ भाजी)

मायाळूची छोटी जुडी, त्याची पानं आणि देठं बोटभर कापून घ्यावी.  कुकरमध्ये ही भाजी धुऊन चिरून किंचितसं मीठ घालून शिजवून घ्यायची. अर्धी वाटी तुरीची डाळही कुकरमध्ये वेगगळी शिजवून घ्यावी. दोन्ही वेगळं शिजवावं. नंतर वाटणासाठी वाटीभर ओला नारळ, लाल सुक्या मिरच्या, थोडीशीच चिंच,  अर्धा चमचा मेथी दाणे आणि मिरच्या तेलावर परतून घ्यायच्या. नंतर हे सर्व साहित्य हळद घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. त्यानंतर तूरडाळ आणि मायाळू एकत्र करून घोटून घ्यायचं. त्यामध्ये मीठ घालायचं. वरून तयार केलेलं वाटण घालायचं. फार पातळ आणि घट्टही नाही अशा पद्धतीने शिजवायचं. वरून मोहरी-हिंग, कढीपत्त्याची फोडणी द्यायची.