आयआरसीटीसीच्या भ्रष्टाचाराची विषबाधा

>>सुरेंद्र मुळीक<<

[email protected]

तेजसमध्ये ज्या अन्नामुळे ही विषबाधा झाली ते अन्न पुरविण्याची जबाबदारी (IRCTC) इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशनची होती. रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना नेहमीच सांगणे असते की, रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच जेवण किंवा इतर खाण्याचे पदार्थ घ्या. तेजसच्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या सूचनांचे तंतोतंत पालनही केले होते. तरीही त्यांना विषबाधा झाली. नशीब इतकेच की, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही म्हणूनच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे किंवा रकाने भरले नसावेत मंत्रीही घटनास्थळी पोहचले नाहीत. याचा अर्थ ही घटना गंभीर नाही असे होत नाही. तसे पाहिले तर एल्फिन्स्टन दुर्घटनेएवढीच ही घटना गंभीर आहे.

तेजस’ गाडीत काल प्रवाशांना विषबाधा झाली आणि भारतीय रेल्वे प्रशासनाचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले. एल्फिन्स्टन दुर्घटनेची जखम ओली असतानाच तेजसच्या प्रवाशांना विषबाधा झाल्याचे समजताच प्रवाशांमध्ये संताप पसरणे साहजिकच आहे. तरीही प्रवाशांनी संयम राखला. पण वारंवार अशा दुर्घटना घडल्या तर प्रवासी संयम राखतीलच असेही नाही आणि त्यांनी संयम का राखावा, असाही प्रश्न आहे. यामुळेच अशा दुर्घटना का घडतात याचा रेल्वे प्रशासनाने विचार करण्याची वेळ आली आहे. एखादी दुर्घटना घडल्यावर तेथील अधिकाऱ्याला निलंबित करावयाचे आणि चौकशी समिती नेमावयाची हे आता नित्याचेच झाले आहे. पण त्यानंतर निलंबित केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई कोणती झाली. चौकशी समितीचा अहवाल काय आहे, समितीने कोणाला दोषी ठरविले, समितीने सुधारणा कोणत्या सुचविल्या हे सारे गुलदस्त्यातच राहते. ‘तेजस’मध्ये झालेल्या अन्न विषबाधेबाबत यापेक्षा काही वेगळे घडणार नाही. चौकशी समिती नेमली एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित केले आणि प्रवाशांनी बाहेरचे खाल्ल्याने विषबाधा झाली असे सांगून चौकशी समिती मोकळी झाली. पण हे काही पटण्यासारखे नाही. विषबाधा झालेले २४ जण एकाच ग्रुपमधील नव्हते. ते तर सारे वेगळे होते. म्हणजेच प्रवासास निघण्यापूर्वी या सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी काही खाल्ले असावे मग सर्वांनाच विषबाधा कशी झाली, असा प्रश्न निर्माण होतोच. अशा घटना घडू नये याबाबत रेल्वे प्रशासन काहीच बोलण्यास तयार नाही. त्यामुळे अशा दुर्घटना घडतच राहणार असे मानून प्रवाशांनी रामभरोसे प्रवास करावयास हवा.

तेजसमध्ये ज्या अन्नामुळे ही विषबाधा झाली ते अन्न पुरविण्याची जबाबदारी (IRCTC) इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशनची होती. रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना नेहमीच सांगणे असते की, रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच जेवण किंवा इतर खाण्याचे पदार्थ घ्या. तेजसच्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या या सूचनांचे तंतोतंत पालनही केले होते. तरीही त्यांना विषबाधा झाली. नशीब इतकेच की, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही म्हणूनच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे किंवा रकाने भरले नसावेत व मंत्रीही घटनास्थळी पोहचले नाहीत. याचा अर्थ ही घटना गंभीर नाही असे होत नाही. तसे पाहिले तर एल्फिन्स्टन दुर्घटनेएवढीच ही घटना गंभीर आहे. एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेला रेल्वेसोबत आपण सारेच जबाबदार होतो. पण ‘तेजस’मधील या विषबाधेला केवळ आणि केवळ रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे हे विसरून चालणार नाही. या सर्व दुर्घटनेत ‘कोकण रेल्वे’चे खरोखरच कौतुक करावयास हवे. कारण कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी ‘तेजस’ला चिपळूण येथे थांबविण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर चिपळूण स्थानकाबाहेर रुग्णवाहिन्यांची सोय करून प्रवाशांना रुग्णालयात नेले. पण तेजसचा मुकुट घालून मिरविणाऱ्या मध्य रेल्वेने मात्र गप्प बसणे पसंद केले. एरवी ऊठसूट पत्रके काढून पोपटपंची करणाऱ्या जनसंपर्क विभागाने गप्प राहून ते प्रकरण दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. वास्तविक तेजस ही मध्य रेल्वेची गाडी मुळात किती वाजता सोडावी हेच मुळी या मध्य रेल्वे प्रशासनाला समजले नसावे म्हणूनच पहाटे ५ वाजता ही गाडी सोडून त्याच रात्री गोव्यावरून परत आणण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतला. यामुळे मे महिना वगळता मागील चार महिने ही गाडी रिकामीच धावत आहे. १६ डब्यांपैकी जेमतेम २ डबे भरतील इतकेच प्रवासी या तेजसमध्ये असतात. मागील ५ महिन्यांत या गाडीतून मी किमान पाच वेळा प्रवास केला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी या गाडीत देण्यात आलेल्या जेवणाचा वाईट अनुभव आला. सकाळी चहा आणि उपम्याबरोबर देण्यात आलेली हिरवी चटणी पूर्णतः आंबली होती. याबाबत विचारले असता कॅटरिंगवाला म्हणाला की, ‘‘साहब क्या करेंगे गाडी तो सबेरे ५ बजे निकलती है, तो सारी तयारी तो रात को ही होगी ना’’ याचाच अर्थ तेजसमध्ये सकाळी मिळणारा नाश्ता रात्रीच तयार होत असावा. तर दुपारचे जेवण हे रत्नागिरी येथे लोड होते. रत्नागिरी येथे सकाळी १०.३० वाजता गाडी पोहचते म्हणजेच सकाळी केलेले जेवण दुपारी प्रवाशांना मिळते. तेजसमध्ये पॅन्ट्री कार कोच नाही त्यामुळे IRCTC बाहेरील ठेकेदाराकडून जेवण करून घेते. तेजसमध्ये ज्या अन्नामुळे विषबाधा झाली ते अन्न कोणत्या ठेकेदाराने पुरविले हे नाव सांगण्यास मध्य आणि कोकण रेल्वेने नकार दिला. पण पत्रकारांनी त्याचा शोध घेतला तेजसला अन्नपुरवठा करणारा ठेकेदार हा स्थानिक नसून परप्रांतीय  असल्याचे समजले. तेजसमध्ये गोवा-करमाळी येथे नाश्ता चढविणे आणि रत्नागिरी येथे जेवण चढविण्याचे हा ठेकेदार काम करतो. रविवारी झालेली दुर्घटना ही नाश्त्यातील ऑम्लेटमुळे झाली असे प्रवाशांचे म्हणणे आहे. यात गंभीरपणे रेल्वे प्रशासन व ठेकेदारानेही लक्ष घालावयास हवे. कारण अनेक ठिकाणी भेसळीचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ऑम्लेट म्हणून देण्यात आलेली अंडी ही नक्कीच कोंबडीची होती का अन्य कोणत्या पक्ष्याची याचीही चौकशी व्हावयास हवी. ही चौकशी प्रवाशांसाठी मुळीच करू नका निदान रेल्वे प्रतिष्ठेसाठी करा. कारण ‘तेजस’ ही भारतीय रेल्वेची वेगवान धावणारी आलिशान गाडी आहे. म्हणूनच प्रवाशांकडून जेवणासाठी चक्क ३७५ रुपये घेतात. पहिल्यावेळी मीसुद्धा हे पैसे भरले पण जेवणाचा दर्जा पहाता ते १०० रुपयाचेही नसल्याचे दिसले. म्हणूनच नंतरचा प्रवास `No Lunch No Food’ असा शेरा मारूनच करीत आहे. रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशांची भूक पाहताना असे वाटते जर रेल्वे प्रशासनाने खरोखरच या खानपानमध्ये लक्ष दिल्यास रेल्वे तिकिटापेक्षा यात अधिक पैसे मिळू शकतात.

२००५ साली लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना या खानपान सेवेत बदल करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. वर्षानुवर्षे एकच व्यक्ती चालविणाऱ्या या खानपान सेवेस त्यांनी लाल सिग्नल दिला आणि निविदा पद्धत सुरू केली. लालूप्रसाद यांच्या या निर्णयाला ठेकेदारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनीच विरोध केला. कारण यात मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार होता. म्हणून कोणाच्या दबावाला बळी न पडता लालूप्रसाद यादव यांनी निविदा पद्धत सुरू केली. या निर्णयानंतर हावडा-कोलकाता मेलमधील खानपान सेवेची निविदा चक्क ८३ लाख ६० हजाराला गेली जी पूर्वी ५ लाखाला जात होती. वांद्रे स्थानकावरील कॅण्टीनचे उत्पन्न ७८ हजार होते ते ३४ लाख झाले आणि नागपूर स्थानकावरील उत्पन्न ३२ हजारावरून १६ लाख झाले. या सर्वांमुळे रेल्वेच्या खानपान सेवेच्या उत्पन्नात चक्क १३ कोटींवरून १०० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. आज या गोष्टीला १२ वर्षे झाली म्हणजे यावरून आपण ठरवू शकतो की खानपान सेवेत किती उत्पन्न मिळत असते आणि किती भ्रष्टाचार! तेजसमधील दुर्घटना ही IRCTC च्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे पाप आहे