मुंबईत फुटबॉल फीव्हर

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानात यंदा रंगणाऱया फिफा अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ‘फीव्हर’ मुंबईसह महाराष्ट्रातील क्रीडा शौकिनांना चांगलाच चढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुंबई जिमखान्यावर ‘ महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ फुटबॉल महोत्सवाचे उद्घाटन फुटबॉलला ‘किक’ मारून केले. त्यानंतर मुंबईच्या विविध मैदानांत ३ लाखांवर शाळकरी विद्यार्थ्यांनी वादळी पावसाच्या रिपरिपीत फुटबॉल खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. महाराष्ट्रभर फुटबॉल फीव्हरने ग्रासलेल्या १५ लाख विद्यार्थी व फुटबॉल शौकिनांनी चेंडूला किक मारत युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱया हिंदुस्थानी संघाला आगळय़ा शुभेच्छा दिल्या.

फोर्टच्या मुंबई जिमखाना मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ महोत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी क्रीडामंत्री विनोद तावडे हेही उपस्थित होते. या उद्घाटन सोहळय़ानंतर मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार व राजकीय पत्रकारांसह हजारो विद्यार्थ्यांनी फुटबॉलच्या प्रदर्शनीय लढती खेळण्याचा आनंद लुटला. विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधीही या आगळय़ा महोत्सवात सहभागी झाले होते. यापूर्वी विधानसभा व विधान परिषदेच्या आमदारांनीही फुटबॉल लढत खेळून फिफा अंडर – १७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे स्वागत केले होते.