नवी मुंबईत फुटबॉल फिव्हर, सराव लढतींनी क्रीडाशौकिनांत उत्साह

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

फिफा अंडर १७ वर्ल्डकप २०१७ मध्ये सहभागी झालेले विविध देशांचे फुटबॉल संघ नवी मुंबईत डेरेदाखल झाले असून वाशी आणि नेरूळ येथील मैदानांवर सराव सामने सुरू झाले आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहचला असून संपूर्ण शहरात फुटबॉलचा आगळावेगळा उत्साह निर्माण झाला आहे.

नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर ६ ऑक्टोबरपासून फिफा वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी शहरात चार ठिकाणी फुटबॉलपटूंना सराव करता यावा यासाठी सराव मैदाने तयार करण्यात आली आहेत. यामध्ये यशवंतराव चव्हाण उद्यान, नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनचे मैदान, डी. वाय. पाटील विद्यापीठ मैदान आणि स्टेडियमलगतच्या मैदानाचा समावेश आहे. या सर्वच मैदानांवर आता सराव सामन्यांची सुरुवात झाली आहे. हे सराव सामने उपांत्य फेरीचा सामना होईपर्यंत सुरू राहणार आहेत. ६ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि तुर्की, पॅराग्वे आणि माली, ९ ऑक्टोबर रोजी तुर्की आणि माली, पॅराग्वे आणि न्यूझीलंड, १२ ऑक्टोबर रोजी तुर्की आणि पॅराग्वे, अमेरिका आणि कोलंबिया यांच्यादरम्यान सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी १६ व्या फेरीचा तर २५ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे.

परदेशी खेळाडूंचे विशेष आकर्षण
सराव मैदानांमध्ये सुरू असलेले सामने पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींची गर्दी होत आहे. त्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. फुटबॉलपटूंचे आणि फुटबॉलच्या चाहत्यांचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबई नगरी सज्ज झाली असून शहरातील सर्वच चौक फुटबॉलने सजविण्यात आले आहेत. नेरूळमध्ये स्टेडियमच्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या भूखंडांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

१७०० पोलिसांचा फौजफाटा
फिफासाठी १५० पोलीस अधिकारी आणि १ हजार ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये एडीआरएफ, एसपीजी, एसआरपीएफ आणि आरसीपी जवानांचाही समावेश असल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितले. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि चार सराव मैदानांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याने संपूर्ण नवी मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.