फुटबॉल Fever


बाळ तोरसकर

फुटबॉल जरी आपल्या मातीतला नसला तरी खास मातीशी नातं सांगणारा खेळ

पावसाळ्यात जर तुम्ही काही मैदानात पोहोचलात तर तुम्हाला मुले फुटबॉल खेळताना हमखास दिसतील. खरं तर फुटबॉल हा खेळ जगातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध असा आहे. फुटबॉल हा तसा रंगडय़ा खेळाडूंसाठी असलेला एक खेळ म्हणता येईल. कोणत्याही खेळातील बेधडक, बेफाम खेळणाऱया व संघाला विजयपथावर घेऊन जाणाऱया खेळाडूला सर्वच जण डोक्यावर घेतात. त्यामुळेच फुटबॉलमधील खेळाडू वेगवेगळ्या देशांचे असले तरी त्यांचे फॅन्स जगभर पाहायला मिळतात.

फुटबॉलच्या एका संघात अकरा खेळाडू असतात व त्यापैकी एक असतो गोलकीपर. जर संघात सातपेक्षा कमी खेळाडू असतील तर हा खेळ सुरू होऊ शकत नाही. संपूर्ण सामना दीड तास म्हणजे नव्वद मिनिटांचा असतो. यात विश्रांतीसाठी पंधरा मिनिटांचा वेगळा कालावधी दिला जातो. म्हणजेच पहिला पंचेचाळीस मिनिटांचा खेळ किंवा डाव झाल्यावर १५ मि. विश्रांती दिली जाते व त्यानंतर दुसरा पंचेचाळीस मिनिटांचा डाव खेळवला जातो. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली व काही कारणाने खेळात व्यत्यय आला तर तितका वेळ सामन्यात समाविष्ट केला जातो. खरं तर हा खेळ नैसर्गिक किंवा कृत्रिम हिरवळीच्या आयताकृती मैदानावर खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांवर व मध्यभागी असलेल्या गोल जाळ्यात फुटबॉलचा चेंडू एका संघाने पोहोचवणे तर दुसऱया संघाने तो चेंडू अडवून गोल होऊ न देणे हेच या खेळाचे मुख्य वैशिष्टय़. फुटबॉलमध्ये गोलकीपर वगळता कोणाही खेळाडूला चेंडूला हात लावता येत नाही किंवा हाताळता येत नाही. मात्र गोलकीपरसह इतर सर्व खेळाडू पायासह फुटबॉल छातीने, पाठीवर घेऊन टोलवू शकतात, तर बरेच खेळाडू डोक्याने फुटबॉल मारत फुटबॉलला दिशा देत गोल करताना दिसतात.

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेकीचा कौल घेण्यात येतो. ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला असेल त्या संघाला मैदानाची एक बाजू निवडण्याची संधी देण्यात येते, तर पराभूत संघाच्या खेळाडूने मैदानाच्या मध्यभागापासून फुटबॉलला किक मारून सामन्याला सुरुवात करायची असते. मध्यांतरानंतर दोन्ही संघांच्या गोल करण्याच्या दिशा बदलल्या जातात. एखाद्या खेळाडूने किक मारल्यानंतर फुटबॉलने गोलरेषा पार केली की, त्या संघाला गोल देण्यात येतो. गोल झाल्यानंतर ज्या संघाने गोल स्वीकारला असेल, त्या संघाला पुन्हा खेळ सुरू करण्याची संधी दिली जाते. ऑफसाइडचा नियम बनवण्याआधी फुटबॉल हा खेळ निरसवाणा वाटत होता. खेळाडू गोलरक्षकाच्या बाजूलाच उभे राहत असल्यामुळे लांबून किक लगावून त्यांच्यापर्यंत चेंडू पोहोचवता येत होता, पण ऑफसाइडच्या नियमांमुळे फुटबॉल खेळातील रंगत आणखीच वाढत गेली. खेळाडूने चेंडू पास करतानाच्या वेळी त्याच संघातील दुसरा खेळाडू हा प्रतिस्पर्धी गोलरक्षक आणि बचावपटूंच्या मागे असायला हवा. समजा, चेंडू पास केल्यानंतर खेळाडू बचावपटूंच्या पुढे असेल आणि त्याच्यासमोर फक्त प्रतिस्पर्धी गोलरक्षक असल्यास, अशा स्थितीत पंच ऑफसाइडचा कौल देतात.

चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने जर एखाद्या खेळाडूने गोलरक्षकाशिवाय अन्य प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून चेंडू ओढून घेतला तर तो ‘फाऊल’ ठरवला जातो. हा गुन्हा जर सौम्य स्वरूपाचा असेल तर धक्काबुक्की करणाऱया खेळाडूला पिवळे कार्ड दाखवले जाते. गंभीर स्वरूपाच्या गुह्यासाठी लाल कार्ड दाखवले जाते. लाल कार्ड दाखवल्यानंतर खेळाडूला त्याच क्षणी मैदान सोडावे लागते. दोन पिवळी कार्डस् म्हणजेच लाल कार्ड मानले जाते. चुकीच्या पद्धतीने खेळाडूला धक्काबुक्की केल्याप्रकरणी किंवा ‘फाऊल्स’नंतर पंच प्रतिस्पर्धी संघाला फ्री किक बहाल करतात. खेळाडूला थेट फ्री किकच्या जागेवरून फ्री किक लगावता येऊ शकते.

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या शरीराला लागून फुटबॉल गोलरेषेच्या बाहेर गेला की, कॉर्नर किक दिली जाते. गोलरेषेच्या कॉर्नरवरून एका खेळाडूने ही कॉर्नर किक लगावायची असते. कॉर्नर किक लगावताना खेळाडू किमान ९.१५ मीटर दूर असायला हवेत. सामन्यावर नियंत्रण करण्यासाठी खेळाच्या नियमांनुसार पंचांनी दिलेले नियम मान्य करणे आणि त्यांचा आदर करणे गरजेचे असते. मैदानावरील मुख्य पंचाच्या मदतीला दोन सहाय्यक पंचही असतात.