आता पालिका शाळांमधून घडणार फुटबॉल स्टार

मुंबई– युवा सेनाप्रमुख, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारामुळे मुंबईत फुटबॉलला सुवर्ण झळाळी मिळू लागली असून आता त्यांच्याच प्रयत्नांमुळे महानगरपालिकेच्या शाळांमधून भविष्यात फुटबॉल स्टार घडताना दिसणार आहेत. पुढच्या वर्षी हिंदुस्थानात १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्‍वभूमीवर मुंबईसह समस्त महाराष्ट्रात फुटबॉलची क्रेझ निर्माण व्हावी आणि हे करीत असतानाच यामधून भविष्यातील स्टार घडावेत यासाठी महानगरपालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यानुसार आता महानगरपालिकेच्या शाळांमधील सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांना सोमवारपासूनच आठवड्यातून दोन दिवस फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येणार असून ‘जस्ट प्ले’ या ऑस्ट्रेलियन संस्थेच्या वतीने या मुलांना आरोग्य, स्वच्छता याबाबतचे धडे दिले जाणार आहेत. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर, महानगरपालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सीईओ हेन्री मेनेजेस, मुंबई सिटी एफसीचे सीईओ इंद्रनील ब्लाह, ओशिनिया फुटबॉल कॉन्फेडेरशनच्या सुप्रिया कुलकर्णी, मुंबई सिटी एफसीचे दिनेश नायर, जस्ट प्ले या संस्थेच्या वेंडी डिकॉस्टा हे मान्यवर उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातून फुटबॉलचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी सुरू झालेल्या या प्रकल्पाला फिफा ही जागतिक फुटबॉलची सर्वोच्च संस्था, अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ), स्पोर्टस् अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (साई), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यूआयएफए) आणि मुंबई सिटी फुटबॉल क्लब या देशातील महत्त्वाच्या संघटनांचा पाठिंबा आहे. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियन सरकार, फुटबॉल फेडरेशन व जस्ट प्ले या संस्थेनेही यासाठी पुढाकार घेतलाय हे विशेष.
अंधेरीतील स्टेडियमचा नऊ महिन्यांत कायापालट
महानगरपालिका, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन, विजय पाटील, एआयएफएफ या सर्वांच्या मेहनतीमुळे मुंबईतील अंधेरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम आकाराला आले. त्यामुळे इंडियन सुपर लीगमधील मुंबई सिटी एफसी संघाला हक्काचे स्टेडियम मिळाले. या वर्षी या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. हे स्टेडियम त्यांच्यासाठी ‘लकी’ ठरले असेही म्हणता येईल. मात्र स्टेडियमला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागलीय. त्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांत या स्टेडियमला नवे रूप मिळाले. त्याचा कायापालट होताना दिसला, असे उद्गार यावेळी आदित्य ठाकरे यांनी काढले
फिटनेस, न्यूट्रीशन्स, हायजिन, ट्रेनिंगवर देणार भर
नव्या योजनेद्वारा मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. त्यानुसार त्यांच्या फिटनेस, न्यूट्रीशन्स, हायजिन, ट्रेनिंगवर अधिक भर दिला जाणार आहे. जेवणाआधी स्वच्छ हात धुवावे यांसारख्या शरीराशी निगडित असलेल्या बाबींवरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहेत.
पीटी शिक्षकांना देण्यात येणार ट्रेनिंग
फुटबॉल खेळण्यासाठी मोठ्या मैदानाची गरज असते. पण महानगरपालिकेच्या ज्या शाळांभोवती छोटी जागा उपलब्ध आहे तेथेही ही योजना राबवण्यात येणार आहे. मुलांना फुटबॉलचे धडे देण्याआधी शाळांतील पीटी शिक्षकांना फिटनेस व खेळाबाबत ट्रेनिंग देण्यात येणार आहे.