सुखोई विमानातून होणार ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आवाजाच्या तिप्पट वेगाने प्रवास करुन अचूक लक्ष्यभेद करणारे क्रूक्ष क्षेपणास्त्र ब्राह्मोस याची सुखोई या लढाऊ विमानातून चाचणी घेतली जाणार आहे. ‘सुखोई ३० एमकेआय’मधून ‘ब्राह्मोस’ची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंगालच्या उपसागरात ही चाचणी याच आठवड्यात होणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास हिंदुस्थानी वायुदलाच्या लढण्याच्या क्षमतेत गुणात्मकदृष्ट्या खूप मोठी वाढ होणार आहे.

सुखोई ३० एमकेआय हे दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. या विमानातून २.४ टन किलो वजनाच्या ब्राह्मोसची चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यास हवेतून जमिनीवर हल्ला करुन शत्रूचे तळ नष्ट करणे, दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराख करणे ही कामं आणखी प्रभावीरित्या करता येणार आहेत.

जमिनीखालील अण्वस्त्रांचे बंकर्स, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स आणि समुद्रावरुन उडणारी विमाने यांना लक्ष्य करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्रावर वचक ठेवण्यात ब्राह्मोस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. लष्कराने गेल्या दशकात २९० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा समावेश स्वत:च्या ताफ्यात केला आहे. याशिवाय ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी २७ हजार १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लष्करासह, नौदल आणि हवाई दलानेदेखील ब्राह्मोस क्षेपणास्त्र आपल्या ताफ्यात दाखल करण्यात रस दाखवला आहे.

जून २०१६ मध्ये हिंदुस्थानचा समावेश क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण संघटनेत (एमटीसीआर) झाला. यामध्ये एकूण ३४ देशांचा समावेश आहे. एमटीसीआरचा सदस्य झाल्यामुळे हिंदुस्थानसाठी क्षेपणास्त्रांच्या पल्ल्याची मर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळेच आता ४५० किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची तयारी हिंदुस्थानने केली आहे. सध्या ब्राह्मोसचे हायपरसॉनिक व्हर्जन विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या वेगाच्या पाचपट असेल.