काही क्षण स्वत:साठी

अनुराधा राजाध्यक्ष

आपल्यावर अत्यंत अवलंबून असणारे आपले अत्यंत प्रिय स्वजन… त्यांच्यासाठी सर्वस्व देणं… यात काहीच गैर नाही. पण हेच थोडेसे सर्वस्वी स्वतःसाठी राखून ठेवले तर…

‘बाई गं… कसा दिवस संपतो कळत नाही… पहाटे ५ वाजता उठते… रात्रीचे ११ वाजतात सगळी कामं संपायला…

‘एवढी ५ ला का उठतेस पण ? फिरायला जातेस की जिमला ?’

‘छे गं.. पाणी येतं ना सकाळी. एक तासच असतं ते.. दिवसभराचं पाणी भरून ठेवून, आंघोळ करून होईपर्यंत एकेक जण उठतो. सासऱयांना लिंबूपाणी, सासूबाईंना चहा, नवऱयाला ग्रीन टी आणि मुलाला दूध देऊन नाश्त्याच्या तयारीला लागते मी .. ’

‘आणि तू काय पितेस?’

‘मी नाश्त्याच्या वेळेला चहा घेते एकदा..’

सर्वसाधारणपणे हीच वृत्ती कर्तव्य भावनेच्या, जबाबदारीच्या नात्यानं बायकांमध्ये दिसून येते. ती चुकीची आहे असं नाही. फक्त सगळ्यांसाठी जगताना स्वतःसाठी जगणंच विसरून जायला होतं. आणि मग आयुष्याच्या एका वळणावर, सगळेजण आपापल्या विश्वात मग्न असताना तिच्या सोबतीला तिचं एकटेपण उरतं. त्यावेळी निर्माण झालेली पोकळी भयंकर असते. तोपर्यंत कोपऱयात धूळ खात पडलेला तंबोरा, कॉलेजमध्ये करत असलेल्या कविता , ‘कशाला हवी ती अडगळ’  म्हणत कचऱयातून गेलेले पेंटिंगचे ब्रश, अशा व्यक्तिमत्त्वाच्या कितीतरी कोपऱयांना जळमटं लागलेली असतात.

योग्य अयोग्यचा विचार, मतं मांडण्याचा अधिकार, आवश्यकतेनुसार स्पष्टवत्तेपणाचा उच्चार, आणि परिणामांचा सांगोपांग विचार करून, योग्य ठिकाणी धाडसी पाऊल उचलण्याचा आचार करणं, म्हणजे परिपूर्ण आयुष्य जगणं .. स्वतःकडे कमीपणा घेऊन परिस्थिती हाताळणं चुकीचं नाही. पण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तिनं घेतलेली माघार, हा तिचा मोठेपणा आहे याची जाणीव समोरच्याला होणंही गरजेचं आहे. आणि ती नसेल तर ती योग्य वेळी योग्य पद्धतीनं करून द्यायलाही हवी. घरासाठी, मुलांसाठी, नवऱयासाठी, नातेवाईकांसाठी वेळ देत असताना, आपलं आयुष्य हे आपल्यासाठीही असतं हे विसरता कामा नये.

दिवसातला थोडा वेळ, वर्षातले काही दिवस हे स्वतःसाठी राखायलाच हवेत. भरभरून श्वास घेण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी, घरच्यांना आपल्या नसण्याची सवय होणंही गरजेचं असतंच.. त्याशिवाय गृहीत धरणं बंद होत नाही. स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी नाही, स्वतःचं अस्तित्व जाणवण्यासाठी हे करायला हवं. स्वतःसाठी जगायला हवं. आपल्या आवडींना जोपासायला हवं. फिरणं,  गप्पा मारणं, व्याख्यानांना जाणं, पुस्तकं वाचणं, सामाजिक कार्यात सहभागी होणं, गाणं, नाचणं, हसणं, बागकाम… काही काहीही… असू शकतं ते… जे स्वतःच्या अंतरंगातून स्वतःला साद देत असतं… आणि त्याच्याशिवाय आपलं आयुष्य अधुरं असतं… आपण ते ते जगायला हवं… कारण त्यागाचा अर्थ उपभोग त्यागणं नव्हे.. तसं झालं तर हसणं मावळतं आणि दडपणांच्या ओझ्याखाली सुरकुत्यांचं कलेवरच फक्त शिल्लक रहातं.

‘स्व’वर विश्वास

‘माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही’ या एका वाक्यावर ती तिचं जगणं घराच्या स्वाधीन करते. पण दुसऱयांवर प्रेम करता करता स्वतःवरही प्रेम करायचं असतं, हे ती विसरूनच गेलेली असते. स्वतःसाठी वेळ म्हणजे फक्त सौंदर्य साधना नव्हे, तर व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्याची साधना .. कारण बऱयाचदा सौंदर्य साधना हीदेखील  कुणीतरी मला सुंदर म्हणावं यासाठी असते. अमुकची बायको सुंदर आहे, तमुकची सून देखणी आहे असं म्हटलं की घरचे सुखावतात म्हणून ती सुखावते. आपल्या डोळयांना आपण सुंदर दिसतो का नाही, अमुक एखादा रंग आपल्याला चांगला दिसतो की नाही हा विचार तिचा स्वतःचाही असू शकतो, ही शक्यताच ती तडीपार करते.. तारतम्य तिलाही असतं, ते इतरांच्या सांगण्याबरहुकूमच वागलं की सिद्ध होतं असं नाही. हा विश्वास मुळात तिला स्वतःला असायला हवा आणि तिनं आपल्या वागण्यातून इतरांना तो द्यायला हवा.

स्वतःसाठी असणे महत्त्वाचे

‘दिसेल ते पुस्तक वाचायचे मी…’ ‘गिर्यारोहकांचा ग्रुप होता आमचा…’ ‘दर महिन्याला एक तरी नाटक बघायचेच मी मैत्रिणींबरोबर…’ या सगळ्या आठवणी आठवायलाही मधल्या काळात वेळ मिळालेला नसतो, इतकी दुसऱयांमध्ये गुंतून गेलेली असते ती. मुलांचा ग्रुप असतो. नवराही री युनियनच्या नावाखाली त्याच्या मित्रांना भेटत असतो. त्या सगळ्यात ती कुठेच बसत नसते. सगळय़ांची होता होता ती स्वतःची कधीच नसते. म्हणूनच सगळ्यांना जिंकून घेता घेता हरल्याची हुरहूर तिचे डोळे पाणवत असते.