रामनामाचा दुपट्टा काढल्यानंतर दिला गेला ताजमहालात प्रवेश

सामना ऑनलाईन । आग्रा

हिंदुस्थानात आलेल्या विदेशी मॉडेल्सना रामनामाचे दुपट्टे काढल्यानंतर ताजमहालात प्रवेश दिला गेल्याची घटना घडली आहे. या विदेशी मॉडेल्स दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी आल्या आहेत. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा ३४ देशांमधल्या तब्बल ४६ मॉडेल्सनी ताजमहालाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या गळ्यात रामनाम लिहीलेले दुपट्टे होते. ताजमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते दुपट्टे काढण्याचे आदेश ताजच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिले. दुपट्टे काढल्यानंतरच त्यांना ताजमहालात प्रवेश देण्यात आला.

विशेष म्हणजे या मॉडेल्सच्या अंगावर असलेले टीशर्ट, कॅप आणि आयकार्ड्सवर संबंधित कार्यक्रमाचे लोगो होते. ताजमहालात कोणत्याही कंपनी किंवा जाहीर कार्यक्रमाचा प्रचार करण्याला मनाई आहे. मात्र, त्याच्याकडे सुरक्षा अधिकाऱ्यांनी लक्षही दिलं नाही. यासंबंधी माध्यमांनी विचारणा केली तेव्हा, पर्यटकांच्या पेहरावावर धर्माशी संबंधित काही लिहीलेलं असेल तर त्याला आम्ही मनाई करत नाही. मात्र, या मॉडेल्स विदेशी आहेत आणि त्या हिंदुधर्मीय नाहीत. त्यामुळे आम्ही ते दुपट्टे उतरवल्यानंतरच ताजमध्ये प्रवेश दिल्याचं ताजच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

स्थानिक हिंदुत्ववादी नेत्यांनी मात्र या घटनेचा निषेध केला आहे. हिंदू धर्म वसुधैव कुटुंबकम या तत्त्वावर आधारित आहे. त्यामुळे जर कोणाला रामाविषयी श्रद्धा आहे, तर त्या व्यक्तिसोबत अशा प्रकारची वागणूक चुकीची असल्याचं हिंदु जागरण मंचाचे प्रदेश महामंत्री अविनाश राणा यांनी म्हटलं आहे.

  • Ganesh Puranik

    अतिशय निंदनीय प्रकार… निषेध