कुंडलीतून जाणून घ्या परदेशात शिक्षणाचे योग!

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष, वास्तुशास्त्र विशारद)

परदेशात शिक्षण घेणे आजकाल सामान्य झाले असले तरी ते सोपे नाही. परदेशात जाऊन रहाणे, तिथल्या वातावरणाशी, लोकांशी जुळवून घेणे, नोकरी करता करता शिक्षण घेणे ते ही आपल्या कुटुंबापासून, देशापासून, मित्र-मैत्रिणींपासून ३-४ वर्षे दूर रहाणे कठीण आहे. ह्या सर्व गोष्टींबाबत निर्णय घेतांना तीन गोष्टींचा विचार करावा – :

१) आर्थिकदृष्ट्या हे शक्य आहे का ? – आर्थिकदृष्ट्या ते कुटुंबाला शक्य आहे का ? ह्याचा विचार व्हावा.

२) शारीरिक आणि मानसिक क्षमता आहे का ? – परदेशात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना काही वेळेस नोकरी करता करता शिक्षण घ्यावे लागते. स्वतः स्वयंपाक करावा लागतो. आणि त्यानंतर स्वतःचा अभ्यास करण्यास वेळ मिळतो. अशा वेळी त्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता आहे का ? ह्याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. कारण प्रत्येक मुलाला ते जमेलच असे नाही. त्यासाठी पूर्वकल्पना देणे चांगले.

३) कुंडलीतील योग – परदेशात शिक्षण घेण्याचे मुलाच्या कुंडलीत योग आहेत का हे तपासून पहाणे.

आर्थिक, शारीरिक, मानसिक क्षमतेबरोबरच कुंडलीतील योग तपासून पहाणे महत्त्वाचे ठरते. कुंडलीत शिक्षणाचे योगाचा विचार हा चतुर्थ आणि नवम स्थानावरून करतात. चतुर्थ आणि नवम स्थानांत असलेले ग्रह, त्या स्थानच्या अधिपतींची कुंडलीत असलेली अवस्था व्यक्ती कोणते शिक्षण घेणार याची कल्पना देऊ शकतात. व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी, त्याच्या वेगळ्या विषयांत असलेला रस ओळखून त्याला त्याप्रमाणे मार्गदर्शन करता येते. हल्ली एक नवीन पद्धत निघाली आहे. विद्यार्थ्यांच्या अंगठ्याच्या ठशांवरून त्या मुलाची आवड, क्षमता, कोणते शिक्षण घेऊन कुठले करिअर करणार हे सांगता येते. कुंडलीवरूनही हे मार्गदर्शन घेता येते. ते कसे त्यासाठी आपण थोडक्यात शिक्षण संबंधी स्थानांची माहिती घेऊ.

चतुर्थ स्थान – : चतुर्थ स्थानावरून प्राथमिक शिक्षण,त्याचे शिक्षण घेण्याची क्षमता,व्यक्तीवर झालेले संस्कार, घर आणि माता ह्या संबंधी गोष्टींबाबत विवेचन करता येते.

नवम स्थान – : ह्या स्थानावरून उच्च शिक्षण, लांबचे प्रवास,भाग्य ह्याचा विचार होतो.

व्यय किंवा बारावे स्थान – : ह्या स्थानावरून परदेशातील वास्तव्य तपासता येते.

आता कुंडलीकडे वळूया. व्यक्तीच्या कुंडलीत जर नवम आणि व्यय/बाराव्या स्थानाचा संबंध चतुर्थ स्थानाशी असेल तर व्यक्ती परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ शकते. चतुर्थ स्थानाचा,नवम स्थानाचा आणि बाराव्या स्थानाचा संबंध व कुंडलीतील दशा/अंतर्दशा पूरक असतील तर व्यक्ती परदेशातच शिक्षण घेईल हे ठामपणे सांगता येते.

उच्च शिक्षणासाठी हल्ली बँकेतून कर्ज घेता येते आणि तो विद्यार्थी परदेशात नोकरी करून हे कर्जाचे हफ्ते बँकेत भरत असतो. तेंव्हा त्याच्या कुंडलीतून परदेशात नोकरी करण्याचे, कर्ज घेण्याचे योग, कर्ज फेडू शकेल की नाही हे योगही तपासून पाहू शकता.

कुंडली किंवा ज्योतिषशास्त्राचा उपयोग इथे अशा प्रकारे होऊ शकतो -: कुंडलीवरून व्यक्तीचे मानसशास्त्र समजून घेता येते. त्यामुळे नुसतेच परदेशात जाण्याचे फ्याड घेऊन घाई करू नये. तुमच्या मुलाची किंवा मुलीची मानसिकता समजून घ्या. परदेशात वास्तव्य करू पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी “Counselling” ची गरज असते. परदेशात जाण्याआधी “Counselling” झाले तर बरे. भारतीय मुला -मुलींनी परदेशात एकटे वाटू शकते. सतत आई -वडील, भावंडांबरोबर राहिलेल्या मुलाच्या वाट्याला सुरवातीचे काही दिवस हे एकटेपण येणार असते. त्याची तशी मानसिक तयारी करून घेणे आवश्यक ठरेल.

आत्मविश्वास, आर्थिक आणि मानसिक बळ ह्या आधारावर आपल्या मुलाचे परदेशातील वास्तव्य नक्कीच यशस्वी ठरेल.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. [email protected]