कल्याणच्या ‘जंगलबुक’मध्ये वनखाते नापास


सामना प्रतिनिधी । कल्याण

‘जंगल वाचवा.. पर्यावरण राखा..’ असा संदेश सरकारमार्फत वारंवार दिला जात असला तरी प्रत्यक्षात चार वर्षांमध्ये कल्याण तालुक्यातील जंगल व डोंगरांना 135 वेळा भीषण आगी लागल्या. त्यात 550 हेक्टर वनसंपदेची राख झाली. एकीकडे लाखमोलाची ही वनसंपदा मातीमोल होत असतानाच वनखाते मात्र कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून आले आहे. कल्याणच्या ‘जंगलबुक’चा विचार केला तर त्यात वनखाते सपशेल नापास झाले असून हा दुर्लक्षपणा भविष्यात धोक्याची घंटा ठरणार आहे.

मांगरूळ, वरप, मलंगगड येथील संरक्षित वनक्षेत्र वारंवार आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. समाजकंटकांनी लावलेल्या आगीत गेल्या सहा महिन्यांत लोकसहभागातून लावलेली दीड लाख झाडे जळून खाक झाली, तरीही वनविभाग याबाबत गंभीर नसल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या चार वर्षांत कल्याण तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील 6192 हेक्टर वनक्षेत्रापैकी 550 हेक्टर जमीन वणव्यात खाक झाली.

का लावल्या जातात आगी?
दिवाळीनंतर आगीच्या घटना वाढतात. डोंगराळ भागात झाडांचा सुकलेला पाला, गवतात एखादी ठिणगी पडली की क्षणात तिचे वणव्यात रूपांतर होते. फायर ब्लो मशीन, फायर ऑचर अशी अत्याधुनिक आगप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने झाडाच्या झावळ्याने आग विझविण्याची नामुष्की प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांवर येते. शिकारीसाठी आगी लावणारे महाभाग आहेतच, त्याहीपेक्षा वनजमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी भूमाफियांचा या आगीमागे हात असल्याची उघड चर्चा आहे.

वनसंपदेच्या संरक्षणासाठी फक्त 28 कर्मचारी
कल्याण परिसरातील 6192 इतक्या विस्तीर्ण वनक्षेत्राचे रक्षण करण्यासाठी वनविभागाकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. किमान 10 अधिकारी आणि 150 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून सध्या केवळ एक वन परिक्षेत्र अधिकारी, चार वनपाल, 22 वनरक्षक आणि एक लिपिक असा अवघ्या 28 जणांचा कर्मचारीवर्ग आहे. वनविभागाच्या हद्दीत वणवा, अतिक्रमण, वृक्षतोड, वन्य जिवांची शिकार, तस्करी होऊ नये याची खबरदारी हे अपुरे मनुष्यबळ कसे घेऊ शकेल याचा शासनाने कधीच विचार केला नाही.