अरण्य वाचन…हरणांचे घर

अनंत सोनवणे,[email protected]

महाराष्ट्रातल्या संपन्न जैवविविधतेमुळे खास काळवीट अभयारण्य म्हणून जतन करण्यात आलं आहे. ते म्हणजे नगर जिल्हय़ातलं रेहेकुरी काळवीट अभयारण्य.

अभिनेता सलमान खान याचं शिकार प्रकरण सध्या बरंच गाजतंय. राजस्थानमधल्या जंगलात काळविटाची शिकार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काळवीट हा हरिणवर्गीय प्राणी संरक्षित वन्यजीवांच्या यादीत असून त्याची शिकार करणं कायद्यानं गुन्हा आहे. सुदैवानं महाराष्ट्रातल्या संपन्न जैवविविधतेमुळे महाराष्ट्रातही काही ठिकाणी काळवीट पाहायला मिळतात. अशाच अधिवासांपैकी एक खास काळवीट अभयारण्य म्हणून जतन करण्यात आलं आहे. ते म्हणजे नगर जिल्हय़ातलं रेहेकुरी काळवीट अभयारण्य.

नगरच्या कर्जत तालुक्यातल्या रेहेकुरी गावातलं हे संरक्षित जंगल. क्षेत्रफळ फक्त २.१७ चौ. कि. मी. महाराष्ट्र राज्यातलं हे दुसऱया क्रमांकाचं सर्वात लहान अभयारण्य मानलं जातं. आकारानं लहान असलं तरी खास काळविटांच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेलं असल्यानं या अभयारण्यात काळविटांची संख्या खूपच चांगली आहे.

काळवीट हा तृणभक्षी प्राणी हिंदुस्थान, नेपाळ व पाकिस्तानात आढळतो. नराचं वजन साधारणतः २0 ते ५७ कि. ग्रॅम. तर मादीचं वजन २० ते ३३ कि. ग्रॅम असतं. नराच्या डोक्यावर ३५ ते ७५ सें. मी. उंचीची वैशिष्टय़पूर्ण शिंगे असतात. नराच्या शरीराचा वरचा भाग आणि पायांचा बाहेरील भाग काळपट गडद तांबूस रंगाचा असतो, तर पोटाकडचा आणि पायांच्या आतला भाग पांढऱया रंगाचा असतो. मादी आणि पिलांचा रंग पिवळसर तांबूस असतो. नर त्याच्या अधिपत्याखालील क्षेत्राचं प्राणपणाने रक्षण करतो. आपल्या क्षेत्रात दुसऱया नराचा शिरकाव खपवून घेतला जात नाही. सहा महिने पोटात सांभाळल्यानंतर मादी एका वेळी एका पिल्लाला जन्म देते. काळविटाचे जीवन १० ते १५ वर्षांचे असते.

विसाव्या शतकात अनिर्बंध शिकारीमुळे काळविटांची संख्या झपाटय़ाने घटत गेली. आता रेहेकुरीसारख्या संरक्षित जंगलांमुळे काळविटाचं अस्तित्व टिकून आहे.

काळवीट हे रेहेकुरी अभयारण्याचं प्रमुख आकर्षण असलं तरी इथं इतरही काही जातींचे वन्यजीव पाहायला मिळतात. त्यात चिंकारा, खोकड, लांडगा, वटवाघूळ, ससा इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. या लहानग्या जंगलातलं पक्षी विश्वही तसं बऱयापैकी संपन्न आहे. गवती रान किंवा काटेरी झुडुपं ज्यांचा अधिवास आहे, असे पक्षी इथं प्रामुख्यानं आढळतात. कापशी, सापमार गरुड, खरुची, बगळा, करकोचा, तित्तर, चंडोल, डोंबारी, पिपिट, नीलपंख, सातभाई, चिरक, वटवटय़ा, गप्पीदास, मुनिया, भारीट, हारिण वगैरे पक्षी इथं दिसतात.

रेहेकुरी अभारण्यातल्या आत स्वतःचं वाहन घेऊन जाता येतं. मात्र इथं पायी फिरण्याची परवानगी असल्यानं आणि अभयारण्याचं क्षेत्रफळ खूपच कमी असल्यानं इथं पायी भटकणं अधिक योग्य ठरतं. जंगलातल्या पाऊलवाटांवरून आतवर छान भटकावं आणि वन्यजीवांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. मात्र ते करताना अरण्य वाचनाच्या नियमांचं काटेकोर पालन करायला हवं. जंगलात भटकताना भडक रंगांचे कपडे वापरू नयेत. मोठमोठय़ानं बोलू नये. गाणी वाजवू नयेत.

रेहेकुरीचं जंगल शुष्क आणि उघडय़ा प्रकारचं असल्यानं इथं वन्यजीव निरीक्षणात कोणताही अडथळा येत नाहीच. शिवाय वनविभागानंही पर्यटकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी मचाण बनवले आहेत. या मचाणांच्या जागा अत्यंत मोक्याच्या आहेत. तिथं थोडा वेळ शांतपणे बसून राहायचं. अजिबात आवाज न करता वाट पाहिली तर वनदेवता स्वतःच तिची लेकरं-बाळं आपल्यासमोर सादर करते.

रेहेकुरी काळवीट अभयारण्य

प्रमुख आकर्षण…काळवीट

जिल्हा…नगर

राज्य… महाराष्ट्र

क्षेत्रफळ…२.१७ चौ.कि.मी.

जवळचे रेल्वे स्थानक…दौंड जंक्शन (७० कि. मी.)

जवळचा विमानतळ…पुणे (१५० कि.मी.)

निवास व्यवस्था…वनविभागाचे विश्रामगृह

सर्वाधिक योग्य हंगाम…ऑगस्ट ते एप्रिल