अरण्य वाचन…मुग्ध… गूढ…

अनंत सोनवणे

नागझिरा… वाघ, बिबटय़ा, माकड, रानकुत्रा यांचे जिवंत अनुभव येथेच मिळू शकतात…

साधारणत…आठेक वर्षांपूर्वीचा प्रसंग. नागझिरा जंगलातल्या वनविभागाच्या विश्रामगृहात आमचा मुक्काम होता. हे विश्रामगृह जंगलाच्या अगदी गाभ्यात. वीज नाही. मोबाईलला रेंज नाही. इंटरनेट नाही. जेमतेम निवास करता येईल, अशी व्यवस्था. जिथं राहायचं त्या खोल्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या. दरवाजाची कडी लागत नाही. खोलीत एकमेव मिणमिणता कंदील. अर्थात हा तपशील केवळ वाचकांना तिथल्या परिस्थितीचा अंदाज यावा एवढय़ाचसाठी, तक्रार म्हणून अजिबातच नाही. तर अशा या छान नैसर्गिक वातावरणात रात्रीच्या वेळी आम्ही जेवायला बसलो होतो. विश्रामगृहाच्या खानसाम्याने उपलब्ध सामग्रीतून रुचकर स्वयंपाक केला होता.

अंगणातच आम्हाला खुर्च्या-टेबलं मांडून दिली होती. नेमकं काय खातोय हे कळावं यासाठी प्रत्येक टेबलावर एक कंदील. सभोवार कीर्र अंधार. या साऱया वातावरणाचा आणि जेवणाचा आस्वाद घेत असताना अचानक समोर नजर गेली. अंधारात दोन डोळे लुकलुकताना दिसले! सहकाऱयांना सावध करत बॅटरीचा प्रकाशझोत त्या दिशेने रोखला, तर त्या उजेडात आणखी काही डोळे चमकले! काजव्यांचा महोत्सव भरावा तसे अगणित डोळे लुकलुकू लागले. गडद अंधारात चमकणारे फक्त डोळे! स्थळकाळाचे भान विसरून, मंत्रमुग्ध होऊन आम्ही ते दृश्य पाहत राहिलो! भानावर आल्यानंतर लक्षात आलं की, आसपास हरणांचा एक मोठा कलप चरत होता आणि बॅटरीच्या प्रकाशझोताने थिजून ती हरणं आमच्याकडे पाहत होती! भर जंगलातला, ऐन रात्रीचा तो अनुभव केवळ अविस्मरणीय!

त्याच रात्री नुकतीच झोप लागली असताना विश्रामगृहाच्या मागच्या बाजूला माकडांचा भयंकर चित्कार ऐकू येऊ लागला. त्या आवाजातली भीती जाणवण्याइतपत स्पष्ट होती. काही काळाने तो चित्कार बंद झाला आणि जंगल पुन्हा शांत झालं. फक्त रातव्याचा ‘चुबूक चुबूक’ आवाज येत राहिला. सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱयांकडून समजलं की, रात्री एखादं माकड  बिबटय़ाच्या हल्ल्यात बळी पडलं होतं आणि इतर माकडांनी आकांत करून जंगल दणाणून सोडलं होतं!

जंगलाचे असे थरारक अनुभव नागझिऱयातच मिळू शकतात. कारण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या कोणत्याही अभयारण्याच्या किंवा व्याघ्र प्रकल्पाच्या आत पर्यटकांना रात्री मुक्काम करायला पूर्णतः बंदी आहे. मात्र नागझिऱयातली वनविभागाची विश्रामगृहं जंगलाच्या मध्यवर्ती भागात आहेत. नागदेव डोंगराच्या पायथ्याशी असलेला नागझिरा तलाव म्हणजे नागझिऱयाच्या जंगलाचं मर्मस्थळ. भर उन्हाळय़ातही या तलावात पाणी टिकून असतं. त्यामुळे वन्य जीवांना मुबलक पाणी उपलब्ध होतं. त्याचवेळी पानगळीचा हंगाम सुरू असल्यानं जंगल काहीसं विरळ होतं. त्यामुळेच उन्हाळय़ाच्या दिवसांत वन्य जीवांचं दर्शन अधिक सुलभपणे होतं.

वाघ हा नागझिऱयाचा आत्मा. राष्ट्रपती, त्याची मुलं जय आणि वीरू हे तर अत्यंत गाजलेले नर. तुलनेत मोठय़ा संख्येमुळे बिबटय़ांचं दर्शन होण्याची शक्यता अधिक. तसंच इथं रानकुत्र्यांची संख्याही लक्षणीय आहे. याशिवाय रानगवा, रानडुक्कर, अस्वल, रानमांजर, उदमांजर इत्यादी प्राणीही नागझिऱयात दिसतात.

नागझिरा अभयारण्य वन्य जीवप्रेमींसाठी नंदनवन आहेच, पण वन्य जीवांसाठी तर ते खूपच महत्त्वाचं आहे. ताडोबा-अंधारी आणि कान्हा व्याघ्र प्रकल्पांना परस्परांशी जोडण्याचं काम नागझिरा करतो. त्यामुळे वन्य जीवांचं स्थलांतर सुलभ होतं. या जंगलात फिरताना एक प्रकारचा मुग्ध गूढपणा जाणवतो. हा गूढपणा तुम्हाला वारंवार इथं खेचून आणतो.

नागझिरा वन्य जीव

अभयारण्य (३-६-७०)

प्रमुख आकर्षण वाघ, बिबटय़ा, रानकुत्रा

जिल्हा…गोंदिया

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…१५२ चौ.

जवळचे रेल्वे स्थानक…गोंदिया (४५ कि.मी.)

जवळचा विमानतळ…नागपूर (१५० कि.मी.)

निवास व्यवस्था…वनविभागाची विश्रामगृहं

सर्वाधिक योग्य हंगाम…फेब्रुवारी ते मे

सुट्टीचा काळ…पावसाळा

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…गुरुवार