वणवे का लागतात?

भरत जोशी निसर्गमित्र,[email protected]

महाराष्ट्रात नुकत्याच वणवे लागण्याच्या घटना घडल्या. काय आहे यामागे?

आग, वीज आणि पाणी हे जसे माणसाचे मित्र आहेत तसेच ते शत्रूदेखील आहेत. माणसाचा हलगर्जीपणा आणि त्याने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळेच माणसाला याला सामोरे जावे लागते. म्हणजेच काय तर माणूस स्वतःच्याच पायावर स्वतः दगड मारून घेत असतो आणि राष्ट्रीय संपत्तीचा नाश करीत असतो. मनुष्याने ‘आत्मचिंतन’ करण्याची गरज आहे जेणेकरून भविष्यकाळात आग, वणवे अशासारख्या दुर्घटनांमुळे होणारे राष्ट्राचे नुकसान आपण टाळू शकतो.

आगी कशा लावल्या जातात… एक ते दीड फूट लांबीची उदबत्ती घेऊन ती साग, चंदन अशा जंगलात लावून त्या उदबत्तीभोवती सुका पालापाचोळा ठेवला जातो. ती उदबत्ती आगपेटीच्या काडीने किंवा लायटरने पेटवून तो माणूस जंगलातून डोंगरमाथ्यावर जाऊन बसतो. उदबत्ती हळूहळू शेवटपर्यंत पेटत जाते आणि आजूबाजूला रचून ठेवलेल्या सुक्या पालापाचोळय़ापर्यंत पोहोचून हवेमुळे ती आग सर्वत्र पसरत जाते आणि जंगलाला आग लागते. होत्याचे नव्हते करून टाकते. त्या समाजकंटकाला दुसऱया समाजकंटकाकडून त्याचे पैसे अदा केले जातात आणि खरा व्यवहार सुरू होतो. सरकारच्या वनविभाग यंत्रणेद्वारा चौकशी केली जाते आणि टेंडर काढून त्या जळीत जंगलातील लाकडाची प्रचंड प्रमाणात कत्तल करून वाहनांद्वारे नेली जातात. अशा समाजकंटकांचा शोध घेऊन राष्ट्रीय संपत्तीचे अशाप्रकारे नुकसान करणाऱयांवर सरकारने खटले भरून त्यांना तुरंगात डांबले पाहिजे तरच अशा विघातक, राष्ट्रविरोधक दुष्कृत्यांना लगाम बसेल.

या आगींमुळे औषधी वनस्पती, कीटक, जिवाणू, सर्प, पक्षी, सरडे, पाली, ससे, हरणे, कोल्हे, लांडगे या सर्वांचे जीव धोक्यात येतात आणि त्यामुळे जंगलातील जीवन विस्कळीत होऊन हे वन्यजीव निराश्रीत होतात याची कल्पना सर्वसामान्यांना नसते. ही जाणीव हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे.

हौशे, नवशे, गवसे पर्यटक धूम्रपान केल्यावर विडी, सिगारेट बेजबाबदारपणे कुठेही फेकून देतात. रात्री शेकोटी पेटवून थोडा वेळ बसून शेकोटी न विझवता बेजबाबदारपणे तेथून निघून जातात. अशाप्रकारच्या पर्यटकांच्या निष्काळजीपणा आणि बेदरकारीमुळे राष्ट्रीय संपत्तीचे, हेरिटेजचे नुकसान होत आहे हे पर्यटकांनी लक्षात घेतले पाहिजे.

वणवे टाळण्यासाठी ठोस उपाययोजना

महाराष्ट्रातील सर्व वनविभागात विडी, सिगारेट, शेकोटी प्रतिबंधक नियमावलींचे फलक असतात, त्या फलकांत अधिक वाढ करून प्रवेशद्वारावर ‘सुरक्षा परिपत्रक’ द्यावे.

अटी, नियम आणि कायदे मोडणाऱया पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करून दंडाचा बडगा आवश्यक आहे.

वॉच टॉवरस्थळी…5 कि.मी.च्या परिसरात पाण्याचे टँकर आणि फिरत्या पथकाच्या वाहनात फायर एक स्टिंगविशर प्रशिक्षित वनरक्षकांसह ठेवणे गरजेचे आहे.

पर्यटक, ग्रामस्थ, संयुक्त व्यवस्थापनातील कार्यकर्ते, निसर्गप्रेमी यांना आग विझविण्यासंदर्भातील प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करावे.

फिरत्या पथकांमध्ये आगीला झोडपवून आग विझविण्यासाठी फांद्यांची उपलब्धता करून ठेवणे.

महाराष्ट्रातील नॅशनल हेरिटेज स्थळी अग्निशमन वाहन असणे गरजेचे आहे. हे नसेल तर याची गरज आणि महत्त्व लक्षात घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी वनविभागाने सादर करणे गरजेचे आहे. या सहा सुवर्णनियमांची अंमलबजावणी केल्यास आगी, वणवे टाळून आपण राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळू शकतो.