हायटेक यंत्रणा राबवूनही वणवे सुरुच : 1926 या ‘हॅलो फॉरेस्ट’ हेल्प लाईनवर तक्रारी वाढल्या

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्ह्यात मागील महिनाभरात 36 ठिकाणी लहान मोठे वणवे लागले आहेत. यावर उपाय योजना म्हणून अलिबाग वन विभागाने फायरब्लॉ या यंत्राचा वापर सुरु केला आहे. त्याच बरोबर वणवे विझविण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ’हॅलो फॉरेस्ट’ या शीघ्र प्रतिसाद देणार्‍या हेल्प लाईनचाही नागरिकांकडून वापर केला जात आहे. तरीही वणवे लागण्याचे प्रमाण कमी होत नाहीत.

सध्या ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत, यातून हे वणवे पसरत असल्याचे वन कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. उप वनसंरक्षक अलिबाग याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या 11 परिक्षेत्राना फायरब्लॉ ही अद्यावत यंत्रे देण्यात आली आहेत. या यंत्राद्वारे फायर लाईन मारणे, आग विझवणे या सारखी कामे जलद करता येतात, सध्या थंडीचे वातावरण असतानाही वणवे लागण्याच्या घटना या बहुतांशी मनुष्याच्या हलगर्जीपणामुळे घडत असतात.

यासाठी स्थानिक वन समितीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या बरोबरच वणवे विझविण्यासाठी वनविभागाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागातर्फे जाळरेषा (फायर लाईन ) हा प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात वणवे लागण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचे रायगड जिल्ह्यात दिसून येत आहे.

आगी मानवनिर्मित
पंधरावड्यात कर्जत, म्हसळा, रोहा, पोलादपूर येथे वणवे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या परिसरात मानवनिर्मित वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी पर्यावरण संस्थांनी केल्या होत्या. दारूभट्टी उभारण्यासाठी जंगल परिसरात वणवे पेटवले जातात.

शेतीच्या कामांमुळेही लागतात वणवे
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी पालापाचोळा गोळा करतात. शेतात पिके चांगली यावीत, या उद्देशाने दरवर्षी आपल्या शेतात ‘राब’ भाजतात. शेताच्या जवळच डोंगर असल्याने शेतातील पालापाचोळ्याची ही आग पसरत जाऊन वणव्याचे रूप धारण करते. वणवे लागण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतातील गवत जाळतात. यामुळेही मोठ्या प्रमाणात वणवे लागत असल्‍याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

निष्काळजीपणामुळे वनसंपदा संकटात
आगींमुळे औषधी वनस्पती, कीटक, जिवाणू, सर्प, पक्षी, सरडे, पाली, ससे, हरणे, कोल्हे, लांडगे या सर्वांचे जीव धोक्यात येतात आणि त्यामुळे जंगलातील जीवन विस्कळीत होऊन हे वन्यजीव निराश्रीत होतात याची कल्पना सर्वसामान्यांना नसते. हौशे, नवशे, गवसे पर्यटक धूम्रपान केल्यावर विडी, सिगारेट बेजबाबदारपणे कुठेही फेकून देतात. रात्री शेकोटी पेटवून थोडा वेळ बसून शेकोटी न विझवता बेजबाबदारपणे तेथून निघून जातात. त्यानंतर वेगवान वाऱ्याने आग आजूबाजुला पसरते. अशाप्रकारच्या पर्यटकांच्या निष्काळजीपणा आणि बेदरकारीमुळे वनसंपदेचे नुकसान होत आहे.

हॅलो फॉरेस्ट
हॅलो फॉरेस्ट (1926) ही हेल्पलाईन पाच वर्षापूर्वी वनविभागाने सुरू केली आहे. परंतु येथे संपर्क साधल्यानंतर कर्मचारी नाहीत, तुम्ही ग्रामस्थांना घेवून आग विझवा, तोपर्यंत आम्ही येतो, अशी कारणे दिली जातात. वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत आगीत खूप मोठे नुकसान झालेले असते. मागील आठवड्यात धोकवडे, बेलकडे येथे घडलेल्या घटनांमध्ये याचा वाईट अनुभव आला.