वनात जाऊया

<भरत जोशी > वन्य जीव अभ्यासक

हिंदुस्थानात वनसंपत्ती, जंगले, पक्षी, प्राणी, हिंस्र प्राण्यांची संख्या भरपूर असून तेवढीच जैवविविधता आपल्या देशात अनुभवायला मिळते. हिंदुस्थानी वनसंशोधन, वनांचे संरक्षण, प्राण्यांचे संरक्षण करणाऱया संस्था, एनसीओज आणि सरकार यांनी प्राणिमात्रांच्या संरक्षणासाठी जी वनक्षेत्रे तयार केली ती संरक्षित वनक्षेत्रे.

अमरावतीजवळील मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी संरक्षित वनक्षेत्र असून मेळघाटात असंख्य वाघांचे दर्शन घडते. चंद्रपूरजवळील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ही तर खास वाघांची भूमी. येथे वाघांचे खाद्य असलेले वन्यप्राणी मोठय़ा प्रमाणात असल्याने तसेच जागोजागी लहान-मोठे नैसर्गिक जलाशय व पाणवठे असल्याने हे जंगल वाघांसाठी उत्कृष्ट अधिवास समजले जाते. त्यात गेल्या दोन दशकांपासून ताडोबाचे जंगल वाघांचे उत्कृष्ट जननस्थळ म्हणून नावारूपास आले.

तारू हा या परिसरातील गावप्रमुख वाघाशी मोठय़ा धैर्याने लढून मारला गेला. त्याचे नाव या जलाशयाला आणि त्या सभोवतालच्या जंगलाला पडले. कालांतराने त्याचे तारूबा (ताडोबा) झाले अशी आख्यायिका आहे. त्याचे लहानसे देवालय ताडोबा तलावाकाठी आहे. अंधारी ही या जंगलाच्या मध्य भागातून वाहत जाणारी नदी म्हणून या व्याघ्र प्रकल्पाला जोडनाव ताडोबा-अंधारी हे पडले.

नागपूरपासून जवळ असलेले पेंच हेसुद्धा वाघांसाठी सुप्रसिद्ध म्हणजे निसर्गदेवतेला पडलेले निसर्गस्वप्नच जणू. येथील तांबडय़ा मऊसूत मातीच्या रस्त्यावरून सावकाश जात वन्य प्राण्यांनी दिलेल्या धोक्याच्या सूचनेचा (ज्याला वनभाषेत ‘कॉल’ म्हटले जाते) मागोवा घेत ‘त्याला’ शोधणे  असो वा पाणवठय़ाच्या परिसरात निश्चल-निःशब्द रेंगाळत कानोसा ‘घेत’ त्याची प्रतीक्षा करणे असो, यासारखी उत्कंठा कशातच नसावी.

अशा प्रतीक्षेनंतर झाडीतून एका लयीत संथ गतीने पावले टाकत येणाऱया रौद्रसौंदर्यी, ‘त्याचे’ दर्शन झाले की, थरारून वाटून जाते की मूर्तिमंत निसर्गदेवता म्हणजे वाघच. जंगलचा राजा स्वच्छंदपणे फिरताना पर्यटकांना समाधान तर होतेच, पण धन्यतासुद्धा वाटते. अधिकतम माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या. (www.mahapenchitiger.com)

कोल्हापूरमधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसला असून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिह्यांच्या संरक्षित वनक्षेत्रात तो पसरला आहे. पर्यटकांना मुंबई-पुण्याहून खूप जवळ असलेले असे हा व्याघ्र प्रकल्प असून येथे व्याघ्रदर्शन होते.

नागझिरा वन्य प्राणी अभयारण्य हेदेखील संरक्षित वनक्षेत्रात येत असून भंडारा आणि गोंदिया जिह्यांच्या मध्यभागी वसलेले सुंदर तसेच विविध पक्षू, पक्षी, प्राणी, जलचर यांनी समृद्ध असलेले, नटलेले, सजलेले असे अभयारण्य आहे.

ज्या पर्यटकांना, निसर्गप्रेमींना, वन्य जीव अभ्यासकांना खरे प्राकृतिक जंगल पाहायचे असेल, अनुभवायचे असेल त्यांनी जरूर नागझिऱयाला भेट देऊन वने आणि वन्य जीव पाहण्याचा आनंद घ्यावा. नागझिऱयाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे तिथे वीज नाही आणि त्यातच खरी मजा आहे हे जिज्ञासू अभ्यासकांच्या लक्षात येईल. एखाद्या वन्यजीव अभ्यासकाच्या डोळय़ावर पट्टी बांधून ती नागझिऱयाच्या जंगलात सोडली  आणि त्याने हिरवेगार जंगल पाहिले की, क्षणार्धात तो उद्गारेल हे आहे नागझिऱयाचे जंगल. नागझिरा जंगल हे सदैव हिरवेगार दिसते.

आपण आपल्या आयुष्यात फक्त काँक्रीटची जंगले पाहत बसण्यापेक्षा जंगलात जाऊन वनश्रीचे दर्शन घेऊन निसर्गातील अनमोल ठेवा पाहायला जाऊया. या नद्या, हे डोंगर, हे पक्षी, हे प्राणी एकदा का नष्ट झाले की, माणसाला एकटे जिणे कठीण होऊन बसेल. माणूस एकाकी होईल. म्हणूनच ५ जून रोजी येणाऱया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांनी अशी निसर्गदेवतेसमोर प्रतिज्ञा करू की, ‘‘मी सजग नागरिक असून हिंदुस्थानातील संरक्षित वनक्षेत्रे तसेच त्यातील असणाऱया वन्य जीवांचे मी संरक्षण आणि संवर्धन करीन.’’

संरक्षित वनक्षेत्रे म्हणजे काय?

संरक्षित वनक्षेत्राचे नियम, अटी व बंधने आहेत. अशा या राखीव जंगलात कुठल्याही वन्य जीवाची शिकार, त्यांच्या हालचालींना अडचण येणारी कृती, वन्य जीवांना स्पर्श करणे, त्यांना खाणे-पिणे देणे याला मज्जाव करण्यात आला. अटी, नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कायद्याचा बडगा उचलण्यात आला आणि वन्य प्राण्यांच्या हालचाली, त्यांना लागणारे भक्ष्य, पिण्यासाठी पाणवठय़ाची व्यवस्था आणि सुविधा ‘संरक्षित वनक्षेत्रा’त तयार करण्यात आल्या. सौर ऊर्जेवर स्वयंचलित चालणारे पाण्याचा पंप (हबशे) कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठे तयार करण्यात आले. हिंदुस्थानात अशा पद्धतीची ४८‘संरक्षित व्याघ्र वनक्षेत्रे’ असून महाराष्ट्र राज्यात त्यातील ६ वनक्षेत्रे मोडतात.