अरण्य वाचन…बारा नद्यांचे अभयारण्य

21

अनंत सोनवणे

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मयुरगंज नावाचं संस्थान तेव्हाच्या ओरिसा राज्यात विलीन झालं. आताच्या ओडिशामध्ये हा परिसर मयुरगंज जिल्हा बनला आहे. या जिल्हय़ातल्या पूर्व घाटमालिकेत पसरलं आहे. सिमलीपालचं अरण्य. नितांत सुंदर आणि जैवविविधतेनं समृद्ध अशा या दऱयाखोऱयांच्या प्रदेशात वन्यजीव प्रेमींसाठी अवघं नंदनवन वसलंय. सेमुल म्हणजे लाल सिल्क कॉटन झाडय़ांच्या मोठय़ा संख्येमुळे या जंगलाला सिमलीपाल नाव मिळालं. एकाच जंगलात विविध प्रकारची वने अस्तित्वात असण्याचा दुर्मिळ योगही इथं जुळून आलेला दिसतो. या जंगलातून लहानमोठय़ा बारा नद्या वाहतात. नद्यांकाठी विस्तीर्ण गवताळ प्रदेश निर्माण झाला आहे. अशा वैविध्यपूर्ण अधिवासामुळे इथे वन्यजीवांचंही वैविध्य पाहायला मिळतं.

1957 साली सिमलीपालच्या जंगलात अभयारण्याची स्थापना झाली. 1973 साली व्याघ्र प्रकल्प जाहीर झाला आणि 1980 साली त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. सिमलीपालचं जंगल म्हणजे शोला फॉरेस्टचं आदर्श उदाहरण. चंपक, कदंब, रोजवूड, सालई, मेसुआ, भरई ही इथली प्रमुख वृक्षसंपदा. एकूण एक हजारपेक्षा जास्त वनस्पती आणि वृक्षांच्या प्रजाती इथे आढळतात. तसंच ऑर्चिडच्या सुमारे 96 प्रजातींची इथे नोंद करण्यात आलीय. त्यामुळे सिमलीपालच्या जंगलाला ऑर्चिडस्च खजिना म्हटलं जातं. इथे दरवर्षी सरासरी दोन हजार मिलीलिटर पाऊस पडतो. जोरांडा, बहेरीपानीसारखे नितांत सुंदर धबधबे थडथडाट करत कोसळू लागतात.

bird-2

आजमितीस इथे वाघांच्या संख्येने शंभरी गाठलीय. बिबटय़ांची संख्या चांगली आहे. याशिवाय या जंगलात हत्ती आणि गव्यांची संख्याही उत्तम आहे. वारूळातल्या वाळवीवर ताव मारणारी अस्वलं आढळतात. चिंचोळय़ा तोंडाचं व खवल्यांसारख्या कातडीचे खवले मांजर हा इथला आणखी एक वैशिष्टय़पूर्ण वन्यजीव. शेकरूची जातभाई असलेल्या मोठय़ा खारीही इथे पाहायला मिळतात. याशिवाय भेकर, सांबर, तृणहरिण, रानडुक्कर, रानमांजर, नौसिंगा, माकड इत्यादींसह एकूण 40 हून अधिक सस्तन वन्यजीव इथं आढळतात. तसंच सरपटणाऱया प्राण्यांच्या 30 प्रजाती इथे दिसतात. त्यात नाग, मण्यार, फुरसं, दुतोंडी, धामण, विविध प्रकारचे सरडे आणि रानपाली यांचा समावेश होतो. नद्यांच्या डोहांत मगरींचा संचार असतो.

bird-fff4

सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या 242 हून अधिक प्रजाती आढळतात. सिमलीपालच्या निसर्गाचं आणि वन्यजीवनाचं वर्णन वाचून या जंगलाला भेट द्यावी, अशी इच्छा कोणत्याही वन्यजीवप्रेमीला होणं स्वाभाविक आहे. मात्र तसं कोणतंही नियोजन करण्यापूर्वी एक धोक्याची सूचना! सिमलीपालचा प्रदेश सेलेब्रल मलेरियाचा धोका असलेला परिसरात मोडतो. या जंगलाला भेट देऊन गेल्यानंतर सेलेब्रल मलेरिया झाल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. त्यामुळे पूर्ण वाचन व उपाययोजना करूनच सिमलीपाल भेटीचं नियोजन करावं, हे उत्तम.

सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान
प्रमुख आकर्षण…वाघ, हत्ती
जिल्हा… मयुरगंज
राज्य…ओडिशा
क्षेत्रफळ… 2750 चौ. कि.मी.
निर्मिती … 1980
जवळचे रेल्वे स्थानक …बारीपाडा (50 कि.मी.)
जवळचा विमानतळ … कोलकाता (240 कि.मी.)
निवास व्यवस्था …वनविभागाचं विश्रांतीगृह
योग्य हंगाम… फेब्रुवारी ते जून
सुट्टीचा काळ… नाही
साप्ताहिक सुट्टीचा दिवस… नाही

आपली प्रतिक्रिया द्या