पॉलीहाऊस व शेडनेट धारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा- शेतकरी समन्वय समितीची मागणी

सामना प्रतिनिधी । नगर

पॉलीहाऊस व शेडनेट धारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, त्यांना ४% दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे किंवा ९०% अनुदान द्यावे, दुरुस्ती व देखभालीसाठी ०% व्याजदराने कर्ज द्यावे, पंतप्रधान पीकविमा योजनेत समावेश करावा. आदी मागण्यांसाठी राज्यातील पॉलीहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.

उदय नाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कर्जमुक्ती परिषदेस अॅड. अमोल रणदिवे, बाळासाहेब दरंदले, बाळासाहेब गडाख, किरण आरगडे, प्रल्हाद बोरसे, अंकुश पडवळ, शिवाजीराव पाटील, शिवाजीराव तळेकर, संजय तळेकर, शिवाजी नाईक, दिलीप डेंगळे, सुजाता थिटे यांच्यासह राज्यभरातुन आलेले पॉली हाऊस व शेडनेट धारक शेतकरी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालायसमोरील सैनिक भवन मध्ये राज्यव्यापी कर्ज मुक्ती परिषद पार पडली. पॉली हाऊस व शेडनेट धारक शेतकऱ्यांची व्यथा मांडतांना डॉ. अजित नवले म्हणाले की, पॉली हाऊस व शेडनेट धारक शेतकरी हा आज यशोगाथांचा नायक ठरला आहे. तो श्रीमंत, सुखी व संपन्न आहे. अशी चुकीची प्रतिमा समाजात निर्माण झाली आहे. मात्र गेल्या ४ वर्षांपासून पॉली हाऊस शेडनेट धारक शेतकरी नोटाबंदी, जीएसटी, निसर्गाची अवकृपा व उत्पादित मालाला भाव नसल्यामुळे अत्यंत आर्थिक अडचणीत आला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून पॉली हाऊस शेडनेट व वडिलोपार्जित संपूर्ण शेती विकली तरी त्यांच्यावरील कर्ज फिटणार नाही अशी परिस्थिती आहे.

ऑक्टोबर मध्ये सरकारने दुष्काळाची अधिकृत घोषणा केली त्याचबरोबर कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली. परंतु दुष्काळाची व कर्ज वसुली स्थगितीची घोषणा केवळ कागदावरच असून बँकेचा अधिकारी कर्ज वसुलीसाठी दररोज शेतकऱ्यांच्या दारात जात असल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा फास अवळत चालला आहे. त्याला यातून मुक्त करण्यासाठी संपूर्ण कर्ज माफ करून सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा अन्यथा इथून पुढे बँकेच्या कर्जवसुली नोटीशीची होळी केली जाईल व कर्जवसुली साठी आलेला बँकेचा अधिकारी आपल्या पायावर परत जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात ऊस, कांदा, कापूस, सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पिकला तेव्हा भाव पाडून शेतकऱ्यांना लुटले. दीड लाख रुपये कर्जाच्या अटींमुळे शेडनेट व पॉली हाऊस शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही. म्हणजेच हि कर्जमाफीची योजना नसून कर्ज वसुलीची योजना आहे अशी टीकाही डॉ नवले यांनी केली.

यावेळी अंकुशराव पडवळ, अॅड.अमोल रणदिवे, चंद्रशेखर पाटील, शिवाजीराव पाटील, जयशिंग धाडगे, बाळासाहेब गडाख यांचीही भाषणे झाली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेच्या वतीने २० फेब्रुवारी पासून नाशिक ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात येणार असून या लॉंग मार्च मध्ये महाराष्ट्र भरतील सुमारे १ लाख शेतकरी सहभागी होणार आहेत. अशी माहिती डॉ. नवले यांनी यावेळी दिली.

जिल्हा सैनिक भवनमध्ये कर्जमाफी परिषद पार पडल्यानंतर सर्व शेतकरी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. व तिथे निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळाने उप जिल्हाधिकारी संदीप गाडेकर यांच्याशी चर्चा करून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

बाळासाहेब दरंदले यांनी प्रास्ताविक केले. महेश शेटे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी तळेकर यांनी आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या