लेखकाच्या घरात…शब्दांचे दवबिंदू तिच्या घरात विखुरलेत!

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

वृंदा भार्गवे… तरल, संवेदनक्षम लेखिका… घरातील माणसांचा एकमेकांवरील विश्वास जपणारे तिचे घर तिच्या सुंदर मनोवृत्तीचा आरसा आहे…

‘या अवकाशात मी घर बांधलं आणि घरानं मला अवकाश दिलं… दगडातून मूर्ती कोरतो ना आपण तसं या हवेत, अवकाशात घर बांधतो आपण असं वाटतं मला..’ नाजूक चणीची, सडपातळ, प्रसन्न चेहऱयाची वृंदा माझ्याशी गप्पा मारताना स्वतःशीच बोलल्यासारखी सहज बोलत होती…  mango ice cream आणि स्वतः केलेली आंब्याची डाळ माझ्यासमोर ठेवत ती तिच्या चार मजली घराबद्दल भरभरून बोलत राहिली. ‘बंगला होता आधी आमचा… आजूबाजूला उंच इमारती झाल्या आणि तो अंधार वाटायला लागला… load bearing चा होता तो… त्यामुळे त्याच्यावर बांधकाम करणं शक्यच नव्हतं. काही काळ त्या बंगल्यासाठी ‘कोझी’ असा सोयिस्कर शब्द वापरत होते मी… पण मग वाटलं, नाही नाही, प्रकाश हवाच… कारण प्रकाशाचा आधार असतो… सूर्य दिसायलाच हवा… आई कॅन्सरनं आजारी होती… वडीलही आजारीच… मला त्यांना नवीन घरात आणायचंच होतं म्हणून दीड वर्षात मी ही इमारत बांधली… हो, अक्षरशः मी बांधली… आर्किटेक्टला पत्र लिहिलं होतं मी, मला घर कसं हवं आहे हे सांगायला… ते म्हणालेसुद्धा, घर इतकं seriously कुणी घेतल्याचं मला तरी माहीत नाही… आर्किटेक्टची मदत घेऊन मी घर बांधलं. बिल्डरला दिलं नाही. त्यामुळे या घराची वीट न् वीट मला माहीत आहे… प्रत्येक गोष्ट निवडून पारखून घेण्यासाठी मी स्वतः त्या त्या ठिकाणी गेले आहे… आम्ही तिघं… मोठा भाऊ प्रमोद, बहीण वर्षा. ही इमारत बांधायची ठरवलं तेव्हा त्यांनी लगेच NOC दिलं… मी मुलगा आहे किंवा मी मुलगी आहे म्हणून त्यांनी कधीच हक्काची भाषा वापरली नाही… म्हणून हे घर हवं तसं मला बांधता आलं… मला वाटतं घरातल्या माणसांचा हा एकमेकांवरचा विश्वास जपतं ते घर… घर ही निर्मितीच असते… या घराच्या टाईल्ससाठी संभाजीनगर रोड पालथा घातलाय मी… जिथे जिथे खरेदीला गेले तिथे तिथे एक बाई एवढं सगळं करते आहे म्हणून सगळय़ांनाच कौतुक वाटायचं आणि सगळेच मदतीला यायचे.

कॉलेजमधला कर्मचारी योगेश, माझ्या वहिनीचा भाचा मकरंद खानापूर, अनेक विद्यार्थी सगळय़ांचाच हातभार लागला आहे या घराच्या बांधणीत. कॉलेज रोडला आहे माझं घर. भरवस्तीत, पण घराच्या आत गजबजाट नसावा म्हणून साऊंडप्रूफ काचा हव्यात हे मी ठरवलं. उत्तम चित्रपट बघताना थिएटरचा फील हवा असंही वाटलं. अशा सगळय़ांचा विचार करून तशा तशा सोयी केल्या आहेत मी. हे घर मला हवा तेव्हा स्वतःला शांत एकांतसुद्धा देतं. डिटरमिनेशन असलं, काय हवं आहे याबद्दल फोकस्ड असलं की साधतं सगळं. इंटेरियरसुद्धा मीच केलंय घरातलं. झाडं कोणती लावायची, झोपाळा कसा हवा, फ्लोअरिंग, लिफ्ट, त्यातलं डिझाईन आणि पार्कींगच्या जागेत निर्माण केलेली छोटेखानी मैफलीची मोकळी जागा या सगळय़ांनी सजलेली ही ‘दवप्रभा’… दत्तात्रय, वर्षा, वृंदा, प्रमोद, भावना अशा आईवडील, भाऊबहिणीच्या आणि स्वतःच्या नावाचा अक्षरातून साकार झालेली ही इमारत. म्हाताऱया आईवडिलांना हालचालींना अडथळा नको म्हणून इथे लेव्हल्स नाहीत.

बाथरूममध्ये व्हीलचेअर जाईल याची सोय आहे. धुळीची ऍलर्जी होईल या विचारानं गालिचे नाहीत. घसरून पडायला होईल अशी फरशी नाही. घरातल्या प्रत्येक वस्तूतून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स याव्यात यासाठी सुबक, सुंदर, देखण्या आणि सुटसुटीत वस्तू शोधून शोधून जमवल्या आहेत मी. जिथे सगळं खरं असतं ते घर असतं असं वाटतं मला. घरातच मिळतं स्वातंत्र्य आणि मिळतो एकांत. मुखवटे चपलेसारखे बाहेर ठेवून जिथे मनातलं सगळं बोलता येतं ते घर. आईला मला इथे या घरात आणता आलं, तिला इथे काही दिवस राहता आलं याचा मला खूप आनंद आहे. माझे वडील नव्वद वर्षांचे आहेत आता. ते त्यांच्याच विश्वात असतात. उरले मी एकटीच. पण तसंही प्रत्येकजण एकटाच असतो ना आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर एकटी असले तरी एकाकी नाही मी… कारण मला माझीच सोबत पुरेशी आहे… बोलता येतं मला स्वतःशी… आतमध्ये डोकावता येतं माझ्यात आणि नव्या नव्यानं सापडत राहते मी मला… माझ्या लिखाणाची सुरुवात बंगल्यात असतानाच झाली… फार पुस्तकं नाहीत माझी… ‘व्हाय नॉट आय’ ही मराठी कादंबरी, जिच्या सोळा आवृत्त्या झाल्या. ‘एक वजा क्षण’, ‘मनाचा हरवलेला पासवर्ड’ हे कथासंग्रह. ‘साहित्यवेध’ हा प्राध्यापक वसंत कानेटकरांवरचा संपादित गौरवग्रंथ. ‘मूकवेदना काळोखातील भारताची’ हा अनुवादित ग्रंथ.

अनंत फंदी पुरस्कार, अ. वा. वरटी पुरस्कार आणि आदर्श शिक्षक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाविद्यालयात शिकवते ना त्याचं प्रतिबिंब उमटतं लिखाणात. रोज संबंध येतो तरुणाईशी.. त्यांचं विश्व मग उमटतंच कथेमध्ये.

माझं शालेय शिक्षण गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये झालं. मग ठाणे कॉलेजमध्ये शिकले. तशी शाळेपासूनच गोष्टीवेल्हाळ मी… ऑफ तास असला की गोष्टी रचून सांगायचे. गोष्टीत सगळय़ांना कधी जंगलात न्यायचे, कधी गरीब घरात. संघर्ष कथा असायच्या त्या गमतीदार, रोचक, रंजक… तेव्हासुद्धा वेगळय़ा जगात न्यायची किमया साधली होती मला. जगण्याचं भान कवेत घेणाऱया कथा लिहायला मला आवडतं. सध्या काय झालंय विद्रोह, आक्रोश आणि ग्रामीण भागातलं दाहक सत्य दाखवताना शहरातल्या मध्यम वर्गाकडे, त्यांच्या अव्यक्त समस्यांकडे लक्षच जात नाही कुणाचं. मालिकांमध्येसुद्धा ब्लॅक ऍण्ड व्हाईट कॅरेक्टर असतात. म्हणजे चांगली किंवा अगदी वाईट अशी फक्त चांगली किंवा फक्त वाईट नसतात. खरीखुरी माणसं मग ही characters मला पटत नाहीत. आपली वाटत नाहीत मी दावा करत नाहीये की मी क्रिप्ट लिहीन, पण या माध्यमातून आजच्या तरुणांच्या मनात दडलेल्या खूप गोष्टी यायला हव्यात बाहेर असं मात्र वाटतं. आजची मुलं-मुली खरं तर खूप काही सांगत असतात.

आईवडील आवडत नाहीत त्यांना त्यांच्या ब्लेमगेम सुरू असतो त्यावर काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे. उच्च जातीतल्या रिझर्वेशन असलेल्या तरुणाला खूप काही सांगायचंय ते लोकांसमोर आलं पाहिजे. माझी कथा माणसांना आरपार पाहताना जन्मते. सध्या फिल्म्स खूप बघते आहे. फिल्म प्रॉडक्शन सुरू केलं आहे. ‘माणसं वाचायला आवडतात, जपायला आवडतात वृंदाला आणि या माणसांच्या गर्दीतून स्वतःशी बोलण्यासाठी हक्काचा एकांतही जवळ करावासा वाटतो तिला. तिच्या घरच्या झोपाळा मधोमध आहे बैठकीच्या खोलीत. त्याच्या दोन्ही बाजूला बसण्याची आसनव्यवस्था आहे. ज्या बाजूच्या आसनावर माणूस बसेल त्या बाजूला तोंड करून बसता यावं म्हणून झोपाळय़ावर टेकून बसण्याच्या पाठीकडचा भाग हा काढता घालता आहे जो सोयीनुसार बदलता येतो. तिचं पुस्तकांचं कपाट जुन्या जपलेल्या मासिकं, वृत्तपत्र कात्रणं, यांचं कपाट, झोपाळय़ाच्या परिघात आकाशाला आमंत्रित केल्यासारखी थेट प्रकाशाची सोय वास्तुपुरुष ही संकल्पना जर खरंच अस्तित्वात असेल तर त्या वास्तुपुरुषाला तृप्त करणारं हे वृंदाचं घर आहे… वृंदाच्या घरातून बाहेर पडलं तरी मनात तिचं घर घर करून राहतंच..