केंद्र व राज्यातील भाजप सरकार वावटळीसारखे उडून जाईल!

सामना प्रतिनिधी । कराड

सम विचारी सगळे विरोधक एकत्र आल्यास वादळी वाऱ्यात वावटळे उडतात तसे केंद्र व राज्यातील भाजप सरकार उडून जाईल. त्यासाठी सगळे एकत्रीत येण्यासाठी राज्य व देशपातळीवर व्यापक प्रयत्न करण्याचे काम सुरू आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप सरकारचा त्यांच्याच मंत्र्यावर विश्वास नाही मात्र निती आयोगावर विश्वास आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

सातत्याने एका विशिष्ठ चौकटीत राहून कौटुंबिक पातळीवर आरोप करणाऱ्या भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचे आव्हान आहे. ‘काँग्रेसने १९४७ पासून काय केले व तुम्ही चार वर्षात काय केले याचा लेखा जोगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवाच. त्याचवेळी खरे खोटे सगळे बाहेर येईल. १९४७ पासून काँग्रेसने काय केले ते आम्ही मांडू व तुमच्या चार वर्षाच्या कामाचीही चर्चा करू,’ असे आव्हान चव्हाण यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांचेही कोणी ऐकत नाही

‘मुख्यमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही, ते कोणाविरूद्ध बोलत नाहीत, अशी सरकारची अवस्था झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मंत्र्याविरोधातील अनेक तक्रारी आहेत. मात्र ते कोणत्याच मंत्र्याच्या विरोधात ब्र शब्द काढत नाहीत. मुख्यमंत्र्यांचेही कोणी ऐकत नाही. त्यामुळे राज्य सरकार अस्थीर आहे, असे चव्हाण म्हणाले.

कर्जमाफीचा घोळ कायम

कर्जमाफीचा घोटाळा अजूनही मिटता मिटेना अशी स्थिती आहे. आकडेवारीत गोंधळ आहे. सरकारी यंत्रणेने अहवाल केला असला तरी बँकाना जबाबदार धरले जात आहे. अधिकाऱ्यांविरोधात कारवाई होताना दिसत नाही. कर्ज माफीच्या मोबदल्याच्या वाटपात नको इतकी तफावत आहे. दलालांमार्फत येणाऱ्यांचे कर्ज माफीचे पैसे दिले जात आहेत. थेट येणाऱ्यांना कर्ज माफी मिळत नाही. त्यातूनच धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांना मंत्रालयात आत्महत्या करण्याची वेळ आली. त्या भागात असताना आमच्यापर्यंत त्यांची तक्रार आली होती. त्याबाबत सरकारलाही आम्ही सांगितले होते. धर्मा पाटील यांच्या पाच एकरासाठी चार लाख दिले गेले. मात्र प्रत्यक्षात त्यांचे नुकसान मोठे झाले होते. त्याच गावातील एकाला ८४ गुठ्यासाठी एक कोटी नव्वद लाखांचा मोबदला दिला गेला. एक दलालातर्फे आले तर दर्मा पाटील थेट आले. त्यामुळे त्यांना कमी मोबदला. यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आम्ही सांगितले. मात्र अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला.

पंतप्रधानांसाठी दोन विमान खरेदी

केंद्रात राष्ट्रीय विमा योजनेची जाहीरात मोठी चालते आहे. मात्र त्याचवेळी साडेचार हजार कोटींची दोन विमाने पंतप्रधानांसाठी घेतली गेली, हे लपवले जात आहे. दोन हजार कोटीची मोठी जाहीरात अन साडेचार हजार कोटीची खरेदी लपवली जात आहे. काहीही मागणी केली की, निती आयोग त्याचा निर्णय घेईल, असे उत्तर देणाऱ्या भाजप सरकारचा त्यांच्या मंत्र्यावरच विश्वास नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.

… तर आरएसएसवर बंदी आणाल का?

ज्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरूना पंतप्रधान करा, असे महात्मा गांधीजी सुचवले. त्यावेळी सर्वांनीच त्यास मान्यता दिली होती. त्यात सरदार पटेलही होते. सरदार पटेल यांच्याबाबत जे काही प्रेम दाखवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, सरदार पटेल काँग्रेसचे नेते होते. त्यांच्याबद्दल आदर आहे. तर त्यांनी राष्ट्रीय स्वयसंवेक संघावर देशव्यापी बंदी आणली होती. त्या निर्णयाचे स्वागत करून तुम्ही ती बंदी आणून दाखवा. ते मान्य होईल का? मुंबईच्या कुलाबा येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला काँग्रेसने मंजूरी दिली होती. ती मंजूरी काढून घेवून ते केंद्र अहमदाबाद येथे हलवण्यात आले. हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे आत्ताचे भाजप सरकारकडून अर्थसंकल्पाचे पावित्र्य राखले गेले नाही. त्याचे पावित्र्य मोडून केवळ निवडणुकांवर लक्ष ठेवून काम करणाऱ्या भाजपच्या विरोधात सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.