गोंयकरांच्या घशात माशाचा काटा, ‘फॉर्मेलिन’च्या भीतीने गोव्यातील मासळी बाजार ओस

सामना ऑनलाईन, पणजी

मासळी टिकविण्यासाठी वापरले जाणारे ‘फॉर्मेलिन’ माणसाच्या शरीरात गेल्यास कॅन्सर होतो, अशा बातम्या व्हायरल झाल्यामुळे गोव्यातील सारे मासळी बाजार सध्या ओस पडले आहेत. ‘मत्स्यप्रेमी’ अशी ख्याती असलेल्या गोंयकरांनी नाइलाजाने आपला मोर्चा आता चिकन-मटणाकडे वळवला आहे.

सध्या बंद असलेली मासेमारी येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दरम्यानच्या काळात आंध्र, कर्नाटक, ओडिशा आदी राज्यांतून मासळी गोव्यात येते. पण फॉर्मेलिनच्या धास्तीने गोव्यातील जनतेने मासळी बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

अहवाल बदलल्यामुळे भीती आणखी वाढली

मासळीवर फॉर्मेलिनचा वापर केला जात असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर मडगाव येथील घाऊक मासळी बाजारावर अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी धाडी टाकल्या. त्यानंतर मासळीवर फॉर्मेलिन आहे, असे त्या अधिकाऱयांनी धाडीनंतर सकाळीच सांगून टाकले होते.

मात्र, त्यानंतर मडगाव, पणजी, म्हापसा येथील मासळी विक्रेत्यांनी ‘एफडीआय’च्या धाडीविरोधात बाजार बंद ठेवला. त्यांच्या संघटनेने कृषिमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे धाडीविरोधात दाद मागितली. त्यानंतर मासळीवरील फॉर्मेलिनबाबतचा सकाळी ‘पॉझिटिव्ह’ असलेला अहवाल संध्याकाळी ‘निगेटिव्ह’ बनला. अहवालातील या बदलामुळे संशय बळावून फॉर्मेलिनबद्दलची गोवेकरांच्या मनातील भीती अधिकच वाढली.

‘एफडीए’ अधिकाऱयांना काँग्रेसचा घेराव

सरकारने एफडीएवर दबाव आणून अहवाल दडपले असा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसकडून केला जात आहे. सरकारने धाड टाकलेल्या दिवशीचे सकाळ आणि संध्याकाळचे अहवाल जाहीर करावेत अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यानुसार सरकारने काल रात्री दोन्ही अहवाल सरकारी संकेतस्थळावरून जाहीर केले. त्याने समाधान न झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज एफडीएच्या अधिकाऱयांना घेराव घालून जाब विचारला.

शिवसेनेची पोलिसांत तक्रार

शिवसेनेने याची गंभीर दखल घेत फार्तोडा पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.विरोधकांचा दबाव वाढू लागताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यात लक्ष घालून असले प्रकार आढळले तर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गरज पडली तर बाहेरून येणाऱया मासळीवर बंदी घातली जाईल, असे स्पष्ट केले आहे.