माजी खासदाराचा भाजपला रामराम, काँग्रेसचा ‘हात’ घेतला हाती

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून प्रमुख पक्षांकडून सुरू असलेली उमेदवारांची पळवापळवी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या तोंडावरही सुरू आहे. उद्या मंगळवारी महाराष्ट्रातील 14 जागांसह देशभरात 115 जागांवर मतदान होणार आहे. याच दरम्यान, भाजपचे माजी खासदार काँग्रेसच्या गळाला लागले आहे. हिमाचल प्रदेशमधील हरीमपूर मतदारसंघातून तीन वेळा खासदारकी जिंकलेले माजी भाजप खासदार सुरेश चंदेल यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सुरेश चंदेल यांनी सोमवारी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुलदीप सिंह राठोड आणि प्रदेश प्रभारी रजनी पाटील उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशापूर्वी भाजपकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही झाले होते, परंतु अखेर त्यांनी काँग्रेसचा हात हाती घेतला.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील लोकसभा जागांसाठी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यात 8 राज्यातील 59 जागांसाठी मतदान होईल. यात हिमाचल प्रदेशमधील 4 जागांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर चंदेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.