‘आरशात तोंड बघ’; कोहलीचा गावसकरांकडून समाचार

सामना ऑनलाईन । बेंगळुरू
आयपीएल-१०चं सत्र रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी निराशाजनक ठरलं आहे. कारण आरसीबी आयपीएल स्पर्धेमधून सर्वात आधी बाहेर पडणारी टीम ठरली आहे. त्यामुळे आरसीबी आणि कर्णधार विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू आहे. त्यात भर म्हणजे सुनील गावसकर यांनी देखील विराटला लक्ष्य केलं आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात एका खराब शॉटवर विराट स्वस्तात ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर सुनील गावसकर यांनी त्याच्यावर टीका केली. ‘विराटनं आधी आपलं तोंड आरशात पाहायला हवं. आपण जो फटका खेळलो, तो खराब शॉट होता की नाही, हे त्यानं स्वतःलाच विचारायला हवं. ईडन गार्डन्सवर केकेआरविरुद्धच्या सामन्यातही तो ज्या पद्धतीनं बाद झाला, त्याचाही विचार कोहलीनं करावा’, अशा प्रकारे गावसकर यांनी कोहलीचा समाचार घेतला. आयपीएलच्या १० व्या सत्रात आरसीबीला केवळ २ सामने जिंकता आले. तसेच सर्वाधिक कमी धावांना रेकॉर्ड याच सत्रात आरसीबीनं केला आहे. कोलकाता नाईट रायडरविरोधात अवघ्या ४९ धावांवर आरसीबीची अख्खी टीम तंबूत परतली होती.