सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप

3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी कर्मचाऱ्याने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. या महिला कर्मचाऱ्याने ऑक्टोबर 2018 मध्ये घडलेल्या दोन प्रसंगांचा उल्लेख करणारं एक प्रतिज्ञापत्र रंजन गोगोई यांच्या निवासस्थानी पाठवलं आहे.

एका इंग्रजी वेबसाईटने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, पीडित महिला ही सर्वोच्च न्यायालयाची कर्मचारी होती. 2018 च्या ऑक्टोबर महिन्यात रंजन गोगोई हे सरन्यायाधीश पदावर नियुक्त झाले. त्यानंतर त्यांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने आपल्या आरोपांमध्ये दोन प्रसंगांचा उल्लेख केला आहे. यातील एका प्रसंगांमध्ये गोगोई यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचंही महिलेने आपल्या आरोपांमध्ये म्हटलं आहे. महिलेने गोगोई यांची मागणी फेटाळून लावल्याने गोगोई यांनी महिला व तिच्या कुटुंबाला सातत्याने त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्या काम करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभ केलं गेलं आणि नोकरी जाण्याची धमकीही तिला देण्यात आली, असं या महिलेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. पदाचा वापर करून लैंगिक शोषण आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या प्रतिज्ञापत्रासोबत तिने पुराव्यादाखल काही व्हिडीओही पाठवले आहेत. दुसरीकडे, सरन्यायाधीश यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप बिनबुडाचे असल्याचं गोगोई यांचं म्हणणं आहे.