टी-२० वर्ल्डकप जिंकूण देणाऱ्या खेळाडूच्या वडिलांवर चाकू हल्ला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी संघाला तब्बल २४ वर्षांनी विश्वचषक जिंकूण देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या खेळाडूच्या वडिलांवर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. विश्वचषकात शेवटचं षटक टाकून हिंदुस्थानला अशक्यप्राय विजय मिळवून देणाऱ्या जोगिंदर शर्माचे वडील ओम प्रकाश शर्मा यांच्यावर दोन गुंडांनी हल्ला केला. हिंदुस्थान टाईम्समध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ओम प्रकाश (६८) यांचे हरियाणातील रोहतक येथे मिठाईचे दुकान आहे. रात्री दुकान बंद करत असताना २० ते ३० वयोगटातील दोन तरुण सिगारेट आणि कोल्डड्रिंक्स घेण्यासाठी आले आणि निघून गेले. मात्र काही वेळानंतर परत येत त्याच तरूणांनी गल्ल्यातील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांना विरोध केला असता आपल्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर रोख ७ हजार रुपये घेऊन आणि दुकानात बंद करून फरार झाले, असा आरोप ओम प्रकाश यांनी केला आहे.

ओम प्रकाश यांच्या पोटावर चाकूचे वार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात भादविच्या कलम ३४२ आणि ३७९ ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जोगिंदर शर्माने २००७च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेवटचे निर्णायक षटक टाकले होते. या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव करत पहिल्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यानंतर रात्रीतून हिरो बनलेला जोगिंदर शर्मा हिसारमध्ये डिएसपी पदावर तैनात करण्यात आहे.