संघात स्थान न मिळाल्याने खेळाडूंची हिंदुस्थानच्या माजी गोलंदाजाला भर मैदानात मारहाण

13


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे माजी वेगवान गोलंदाज आणि डीडीसीएच्या निवड समितीचे अध्यक्ष अमित भंडारी यांना सोमवारी भर मैदानात तुफान मारहाण करण्यात आली. यात भंडारी यांच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली असून त्यांना संत परमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपी फरार झाले आहेत.

सोमवारी अंडर 23 संघाच्या ट्रायल दरम्यान भंडारी यांच्यावर दिल्लीच्या सेंट स्टीफन मैदानाच्या मोरी गेटजवळ हल्ला झाला. ट्रायलमध्ये एका खेळाडूची निवड न झाल्याने या खेळाडूने आपल्या मित्रांसह हॉकी स्टीक आणि लाठ्या-काठ्याने अमित भंडारी यांच्यावर हल्ला केला. चार ते पाच तरुणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ट्रायल सामन्यादरम्यान हा प्रकार घडल्याने सामना थांबवण्यात आला. खेळाडूंनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

या प्रकरणी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी निषेध व्यक्त केला असून आरोपींना सोडणार नसल्याचे म्हटले. हा सर्व प्रकार अंडर 23 ट्रायलसाठी निवड न झालेल्या खेळाडूने केल्याचे समजते. आरोपींविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. तसेच रजत शर्मा यांनी भंडारी यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेऊन असल्याची माहिती रजत शर्मा यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या